नामांतरावरुन वाद सुरुच, शहराचं नाव बदललं की संपूर्ण जिल्ह्याचं; विरोधकांचा सवाल
Chatrapati Sambhajinagar : औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव आता धाराशिव करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
Chatrapati Sambhajinagar : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिलीय. औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव आता धाराशिव करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांची नावं आता बदलणार आहेत. पण नावावर संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण होणार आहे. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही याबाबत प्रश्न विचारण्यात येत आहे. विरोधीपक्षातील नेत्यांनी यावरुन सवाल उपस्थित केला असून, केंद्राने याबाबत लवकर माहिती द्यावी, अशी भूमिका घेतली आहे.
केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगर विकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलते. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया होईल, असे काह तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
सामान्य प्रशासन विभागानं काय म्हटले?
औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद या शहराचे नाव बदलून ते "छत्रपती संभाजीनगर" असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक 24 फेब्रुवारी, 2023 अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, " औरंगाबाद ", तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर ", तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.
उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून ते “धाराशिव" असे करण्याच्या भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक 7 फेब्रुवारी, 2023 अन्वये दिलेल्या महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे, “उस्मानाबाद", तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य नाव बदलून ते " धाराशिव ” तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आज केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या फक्त शहरांचीच नावे बदलली आहेत का? तालुका/जिल्हा पूर्वीप्रमाणेच औरंगाबाद/उस्मानाबाद असेल? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केला आहे. हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. 'छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद', असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे.
हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. 'छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद', असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा @Dev_Fadnavis जी! pic.twitter.com/4OK7E28KcD
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 24, 2023
नामांतराचं श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांना : चंद्रकांत खैरे
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. ' केंद्राचं अभिनंदन, मात्र हे श्रेय मुख्यमंत्र्यांचं नसून फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे आहे, असे मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
औरंगाबाद शहराचे नाव #छत्रपती_संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव #धाराशिव करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने #अधिसूचना जारी केली आहे. pic.twitter.com/duRUJknoZx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 24, 2023
आणखी वाचा :
औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद झालं धाराशिव; केंद्राची परवानगी
Aurangabad Renamed : खडकी ते औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर, काय आहे नावाचा इतिहास?