नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
Nana Patole: प्रकृतीची विचारणा करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी, या भेटीमागं मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Nana Patole: नगरपालिका निवडणुका घोषित झाली आणि त्यानंतर उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठीनं उमेदवारी डावलल्यानं नाराज झालेल्या अनेकांनी राजीनामाअस्त्र उगारलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी ऐन शिगेला पोहोचलेली असतानाचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते आबित सिद्दिकी यांची त्यांच्या घरी भेट घेतली. आबिद सिद्दिकी यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी, या भेटीमागं मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मुनगंटीवार यांनी जनतेला धमकावलं यातच आमचा विजय
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच मुनगंटीवार यांनी मूल येथील आपल्या प्रचार सभेत बोलतांना ज्या ठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक निवडून येईल त्या वॉर्डात बोर्ड लावणार आणि त्याठिकाणच्या नागरिकांनी काँग्रेसकडूनच विकास मागावा असं लिहणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर काँग्रेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ यांनी उत्तर दिलं आहे. मुनगंटीवार यांनी जनतेला धमकावलं यातच आमचा विजय असल्याचं समर्थ यांनी म्हंटलं आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. किरण कापगते यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांमुळेच मूल शहराचा विकास झाल्याचं सांगत जनता भाजपलाच निवडून देईल असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान गेल्या दोन दिवसात काँग्रेस विरुद्ध भाजप अशा आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही लढत लक्षवेधी ठरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























