इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन; कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट, तर कुठे गांधीगिरी करत निषेध
आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. याच इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करत आहे. कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट, तर कुठे ग्राहकाला गुलाब देत गांधीगिरी पद्धतीने मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
मुंबई : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या खिशाला वाढत्या इंधन दरवाढीने कात्री लागत आहे. पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे तर डिझेलची किंमतही 90 रुपयांच्या वर गेली आहे. ही दरवाढ अशीच चालू राहिली तर डिझेल देखील शंभर रुपये होण्यास वेळ लागणार नाही. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. याच इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करत आहे. कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट, तर कुठे ग्राहकाला गुलाब देत गांधीगिरी पद्धतीने मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यभरात काँग्रेसने कुठे कुठे आंदोलन केलं, त्यावर एक नजर....
मुंबईत सायकलवर बसून निषेध
एकीकडे कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनची झळ सोसत असलेले नागरिक आता इंधनदर वाढीमुळे पिचले आहेत. या इंधन दरवाढीविरोधात आज आक्रमक होत काँग्रेस मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यावर उतरली आहे. घाटकोपरमध्ये माजी आमदार विरेन बक्षी यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ काँग्रेसने आंदोलन केलं. सायकलवर बसून आंदोलकांनी या इंधन दरवाढीचा निषेध केला.
पुण्यात केंद्र सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने चक्क घोडागाडी आणत आंदोलन केलं. पुण्यातील कुलकर्णी पेट्रोल पंपावर केंद्र सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. पेट्रोलच्या दराने आता शंभरी पार केली आहे. डिझेलचे दरही आता त्याच मार्गावर आहेत. ही वाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही. त्यामुळे मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर पुण्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकातील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले.
नागपुरात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात नागपुरात आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. वर्धमाननगर चौकातील पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे तर डिझेलची किंमतही 90 रुपयांच्या वर गेली आहे. ही दरवाढ अशीच चालू राहिली तर डिझेल देखील शंभर रुपये होण्यास वेळ लागणार नाही. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आज राज्यभर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. यात नागपुरातील वर्धमान नगर पेट्रोल पंप चौकात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी देत पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी केली.
सोलापुरात हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट
सोलापुरात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट मारत निषेध नोंदवला. तर दुसरीकडे पेट्रोल परवडत नसल्याचे सांगत गाड्या भंगारात विकल्या, अशा प्रकारचं उपरोधिक आंदोलन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
शहापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकही आंदोलनात
देशभरात वाढत चाललेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज शहापूर किन्हवली येथे काँग्रेसने रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन केलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करत मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सातत्याने होत असलेल्या इंधन आणि दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात हे आंदोलन एकाच वेळी घेण्यात आलं. रोजच होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या आंदोलनात सामान्य नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग दिसून आला.
येवल्यात गांधीगिरी, ग्राहकाला गुलाब देत मशिनला हार घालून निषेध
देशभरात वाढत चाललेल्या इंधन दरवाढीविरोधात आज नाशिकच्या येवला शहरात काँग्रेसने रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरीने आंदोलन केलं. पेट्रोल पंपावर जात तिथे इंधन भरण्यास आलेल्या ग्राहकाला गुलाब पुष्प देत पेट्रोल मशिनला हार घालण्यात येऊन घोषणाबाजी कारण्यात आली.
चंद्रपुरात 'मोदी पेट्रोल-100 रुपये लिटर' आशयाच्या पेट्रोल पंपाची प्रतिकृती
"मोदी पेट्रोल-100 रुपये लिटर" अशा आशयाची पेट्रोल पंपची प्रतिकृती तयार करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. चंद्रपूरच्या आदर्श पेट्रोल पंप येथे खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने केली. अर्थव्यवस्था सांभाळता येत नसेल तर मोदी सरकारने राजीनामा देण्याची मागणी बाळू धानोरकर यांनी केली.
परभणीच 'भाजप हटाओ, लोकतंत्र बचाव'चे फलक
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आज काँग्रेसकडून परभणीत आंदोलन करण्यात आलं. परभणी शहरातील भिकूलाल पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 'भाजप हटाओ, लोकतंत्र बचाव'चे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी केली.