Congress Meeting : नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसची मुंबईत होणार बैठक, मंत्र्यांसह आमदारांना निरोप
शिवसेनेच्या बैठकीनंतर आता काँग्रेसचीही मुंबईत बैठक होणार आहे. सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना बैठकीसाठी निरोप देण्यात आला आहे.
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकाराणात वेगानं घडामोडी घडत असल्याचं चित्र दिसत आहे. शिवेसेनेचे नेते आणि विद्यमान नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे हे बंडाच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे हे रातोरात पक्षाचे 30 पेक्षा अधिक आमदार घेऊन गुजरातला गेले आहेत. ते सध्या सुरतमध्ये आहेत. त्या ठिकाणी भाजपचे आमदार आणि माजी मंत्री संजय कुटे यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थानी बैठक देखील झाली. शिवसेनेच्या बैठकीनंतर आता काँग्रेसचीही मुंबईत बैठक होणार आहे. सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना बैठकीसाठी निरोप देण्यात आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही बैठक बोलावली आहे.
काँग्रेसकडून सर्व आमदार आणि मंत्र्यांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. त्यामुळं काँग्रेसचे मंत्री आणि आमदारही मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. नागपूर विमानतळावरुन आतापर्यंत मंत्री सुनील केदार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार राजू पारवे, आमदार विकास ठाकरे हे मुंबईला रवाना झाले आहेत. तसेच काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील मुंबईतच्या दिशेनं रवाना झाले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळं त्या बैठकीनंतर काँग्रेस काय निर्णय घेणार हे समजणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 35 शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.
कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकनाथ शिंदेंचं ट्वीट
शिवसेनेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंड झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.