Yashomati Thakur : मनुस्मृतीतील श्लोक नव्हे तर संविधानाची उद्देशिका अभ्यासक्रमात आणा; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया
Amravati News : मनुस्मृतीतील श्लोक नव्हे तर संविधानाची उद्देशिका अभ्यासक्रमात आणावी, अशी प्रतिक्रिया राज्याच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
Amravati News अमरावती : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार,'एससीईआरटी'ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील (Manusmriti) काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. मनुस्मृतीतील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत वादंग सुरू असताना राज्याच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मनुस्मृतीतील श्लोक नव्हे तर संविधानाची उद्देशिका अभ्यासक्रमात आणावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मनुस्मृतीतील एक श्लोक शालेय अभ्यासक्रमात आणला जात आहे. या माध्यमातून हळूहळू पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या अंमलाखाली शिक्षण व्यवस्था आणण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोपही माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्या अमरावती येथे बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
देशात चातुवर्ण्य व्यवस्था सरकारला लादायची आहे का?
समाजामध्ये जातीभेद अस्पृश्यता यांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि महिलांचा अपमान करणाऱ्या महिलांना तुच्छ वागणूक देणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होळी केली होती. त्याच मनुस्मृतीच्या श्लोकांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करणे म्हणजे सरकारची नेमकी आता मानसिकता काय आहे आणि त्यांना आगामी काळात काय करायचे आहे, याचेच हे प्रतीक आहे. पुन्हा एकदा देशात चातुवर्ण्य व्यवस्था सरकारला लादायची आहे का? असा प्रश्न यामधून निर्माण होतो आहे. महाराष्ट्रातील संतांनी आणि समाजसुधारकांनी जातीभेद निर्मूलनासाठी आयुष्य खर्ची घातले असताना, पुन्हा एकदा त्याच मार्गावर समाजाला घेऊन जायचा या मनुवादी सरकारचा डाव असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
संविधानाची उद्देशिका अभ्यासक्रमात आणा- यशोमती ठाकूर
या संदर्भात बोलताना त्या पुढे म्हणाले की, देशाला आणि राज्याला ही सर्वधर्मसमभावाची आणि समानतेची शिकवण देणाऱ्या, माणसाला त्याचे मूलभूत अधिकार मिळवून देणाऱ्या संविधानाची गरज आहे. त्यामुळे जर शिक्षणामध्ये कशाचा अंतर्भाव करायचा असेल तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार प्रदान करणाऱ्या संविधानातील उद्देशिकेचा समावेश शिक्षणामध्ये व्हायला पाहिजे. तसा आग्रह आम्ही आता सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वास्तविक पाहता आता काही दिवसच हे मनुवादी सरकार देशावर आणि राज्यावर राज्य करताना पाहायला मिळणार आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या