'तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालांचे? नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. त्यांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे याचे उत्तर द्यावे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई : देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि गलथानपणाने संपूर्ण देशाला कोरोनाच्या खाईत ढकलले आहे. ऑक्सिजन, इतर आवश्यक औषधे आणि उपकरणांच्या कमरतेमुळे कोरोना रूग्ण तडफडून मरत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपचे नेते हीन राजकारण करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. त्यांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालांचे याचे उत्तर द्यावे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसतानाही महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. देशातील भाजपशासीत राज्यांपेक्षा महाराष्ट्र कोरोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारला वारंवार कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सावध करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक सूचना केल्या. पण त्यावर अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्रातील मंत्री व भाजप नेते त्यांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानत होते. काँग्रेस नेत्यांचे सल्ले वेळीच ऐककले असते तर आज देशाचे स्मशान झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी नक्कीच झाली नसती.
पटोले म्हणाले की, राज्यातील भाजपचे नेते तर या संकटकाळात लोकांच्या मृतदेहावर उभे राहून आपल्याला पुन्हा सत्ता मिळवण्याचा काही मार्ग सापडतोय का? याच्या शोधात आहेत. देशातील अनेक उच्च न्यायालयांनी आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोरोना संकटाळातील केंद्र सरकारच्या नियोजनशुन्य कारभाराचे वाभाडे काढले आहेत. केंद्र सरकारने आरोग्य सुविधा, औषधी, ऑक्सिजन पुरवठा, रेमेडेसिविर इंजेक्शन, व्हेंटिलेटर यांच्या वाटपावर नियंत्रण ठेवून संकटकाळात व्यापार सुरु केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्यातील भाजप नेत्यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करून नफेखोरी करण्याचा प्रयत्न केला होता पण मुंबई पोलिसांनी तो उधळून लावला, असं ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाने 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करताना चलाखी करत लस पुरवठ्याची आपली जबाबदारी झटकून ती राज्य सरकारांवर ढकलली. केंद्राच्या या घोषणेनंतर लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने लसीचे नवीन दर नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. याप्रमाणे, पूर्वी खासगी रूग्णालयांना 250 रूपयांना मिळणारी लस आता 600 रुपयांना मिळणार आहे. केंद्र सरकारला पूर्वीच्याच किंमतीत म्हणजे 150 रुपयांना ही लस मिळणार आहे. तर राज्य सरकाराला यासाठी 400 रुपये मोजावे लागणार आहेत. एकाच लसीच्या अशा तीन वेगवेगळ्या दरांना मान्यता देऊन केंद्र सरकार नफेखोरीला प्रोत्साहन देत आहे. या संदर्भात राहुलजी गांधी यांनी आवाज उचलला तर चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या? चंद्रकांत पाटलांनी भान ठेवून बोलावे, असं नाना पटोले म्हणाले.