एक्स्प्लोर
काँग्रेसतर्फे रणपिसे, वजाहत मिर्झांना विधानपरिषदेचं तिकीट
शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा यांना काँग्रेसतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसतर्फे विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचं तिकीट मात्र कापण्यात आलं आहे. माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, संजय दत्त हे काँग्रेसचे तीन आमदार निवृत्त होत आहेत. माणिकराव ठाकरे आपली आमदारकी वाचावी यासाठी अतोनात प्रयत्न करत होते मात्र त्यांचे तिकीट कापून काँग्रेसच्या नव्या नेतृत्वानं प्रस्थापितांना इशारा दिलेला आहे. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत चर्चा करुन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम हे नेते उपस्थित होते. एकूण 11 विधानपरिषद आमदार यावेळी निवृत्त होणार असून 27 जुलै 2018 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. 16 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन, शिवसेना आणि शेकापच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणखी वाचा























