Pratibha Dhanorkar : चंद्रपूर मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेसमध्ये चढाओढ; प्रतिभा धानोरकरांकडून दावेदारीचा पुनरुच्चार
Chandrapur News: चंद्रपूर लोकसभेसाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दावेदारी नंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पुन्हा एकदा मीच लोकसभेची दावेदार असल्याचा पुनरुच्चार केलाय.
Chandrapur News : चंद्रपूर लोकसभेसाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या दावेदारी नंतर आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी पुन्हा एकदा मीच लोकसभेची दावेदार असल्याचा पुनरुच्चार केलाय. सोबतच त्यांनी 2019 च्या लोकसभेमध्ये वडेट्टीवार यांनी तिकीट नाकारल्याची आठवण करून दिली आहे. एखाद्या दिवंगत लोकप्रतिनिधीच्या परिवारातल्याचं सदस्याला उमेदवारी देण्याची काँग्रेसची (Congress) परंपरा असल्याचा दाखला देत, मीच लोकसभेसाठी नैसर्गिक दावेदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्य म्हणजे जनसमुदाय, कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्या सोबत आहे, त्यामुळे कोणीही दावा केला तरी त्याचा परिणाम माझ्या तिकीटावर अजिबात होणार नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं आहे. सोबतच पक्षाने तिकीट दिली नाही तरी आपण भाजपात जाणार नाही, हे ही त्या सांगायला विसरल्या नाही.
काँग्रेसच्या परंपरेनुसार मी दावेदार
काँग्रेसची परंपरा राहिली आहे की ज्या घरचा एखादा करता पुरुष हा लोकप्रतिनिधी म्हणून निघून गेला असेल, तर शक्यतो त्याच घरातल्या महिलेला तिकीट ही दिल्या जाते. त्याच अनुषंगाने मी देखील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावेदारी केली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक ही मी लढणार आणि त्या दृष्टीने मी माझी तयारी देखील सुरू केली आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी आपण बघितलं की विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या लोकसभा मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त करत आपली देखील दावेदारी केली आहे. आपली इच्छा व्यक्त करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. लोकसभेवरती ते जर दावेदारी करत असतील, तर त्यासाठी सुद्धा आमची हरकत नाही. पण शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे देखील आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या. यदाकदाचीत पक्षाने तिकीट नाकारले, तरी मी काँग्रेस सोडून कोठेही जाणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
शंभर टक्के गॅरंटी, तिकीट तर मलाच मिळेल
पक्षाकडून आदेश म्हणून नाही पण, आपल्याला माहित आहे की, या चंद्रपूर-वणी लोकसभा मतदार संघात दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा हा मतदार संघ होता आणि अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव हा मतदार संघ काँग्रेसने राखला. त्याच्यामुळे पक्षाने आदेश जरी दिला नसेल तरी या लोकसभेची दावेदार म्हणून मी माझी पूर्वतयारी चालू केलेली आहे. पक्षाच्या वतीने तिकीट तर मला मिळेलच, हे शंभर टक्के गॅरंटी मला आहे. कारण दुसरा पर्यायी दावेदार कोणी नाही आणि हक्काची जागा असल्यामुळे ही जागा मी सोडणार नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असे देखील धानोरकर या पूर्वी म्हणाल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेसाठी आपलीच दावेदारी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या