मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या उपस्थिती राजीनामा देणार
Eknath Shinde Resignation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटल्याची चर्चा असून मुख्यमंत्रिपद हे भाजपला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आग्रही होते. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कल्पना असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आल्याचं मत या आमदारांचं आहे. तसेच विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली, त्यांचाच चेहरा वापरण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांनाच मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही होते. पण आता मुख्यमंत्रिपद हे भाजपला जाणार अशी खात्रीलायक बातमी समोर येत आहे.
विधानसभेची मुदत संपली
राज्याच्या विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर पर्यंत होती. ती आता संपल्याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे मंगळवारी सकाळी 11 वाजता राजीनामा देणार आहेत. लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत शिंदे राजीनामा देणार आहेत.
एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी
महायुतीत मुख्यमंत्रिपद सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याबाबत दिल्लीतून एकनाथ शिंदेंना निरोप कळवल्याची माहिती आहे. मात्र या निरोपामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगण्यात येत असून, त्यांनी सोमवारी संध्याकाळपासूनच सर्वच भेटीगाठी रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याने नाराज एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार की महायुतीसोबतच राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान गृहमंत्री अमित शाह लवकरच मुंबईत येऊन, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला शक्य
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. या नव्या सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोमवार, 2 डिसेंबरला संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.
देशातल्या विविध राज्यांमधल्या पोलिस महासंचालकांची परिषद 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत दिल्लीत होणार आहे. ही परिषद 29 नोव्हेंबरला दुपारी सुरु होणार असून, 1 डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं त्या परिषदेचा समारोप होणार आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपलब्धता लक्षात घेऊनच नव्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाच्या शपथविधीचं आयोजन करण्यात येईल.
ही बातमी वाचा: