CM Eknath Shinde : घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणे आम्हाला जमत नाही; आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
CM Eknath Shinde : इतरांप्रमाणे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणे आम्हाला जमत नाही. आम्ही प्रत्यक्षपणे मैदानात उतरून काम करतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
Lok Sabha Election 2024 : निवडणूक काळामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांसोबतच्या बैठका होतच असतात. आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच ही निवडणूक लढवतो आहे. कारण तळागळात जाऊन प्रत्यक्षपणे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच काम करत असतात. इतरांप्रमाणे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणे आम्हाला जमत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्यक्षपणे मैदानात उतरून काम करतोय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लोकसभेची आठ तिकिटे देण्यात आली. त्यातील तीन बदललीत, तर अजून दोन बदलणार, अशी टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यावर केली होती. त्यांच्या या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले आहे. महायुतीचे स्टार प्रचारक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ रामटेकसाठी रवाना झालेय. त्यापूर्वी नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले असता त्यांनी हे भाष्य केलंय.
विदर्भात महायुतीतील सर्व उमेदवार विजयी होतील
आजघडीला महाविकास आघाडीमध्ये तीन तिघाडा अन् काम बिघाडा, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन प्रादेशिक पक्ष ज्यांच्याकडे अजेंडाही नाही आणि झेंडा ही नाही, अशा लोकांनी एका नॅशनल पार्टीची काय अवस्था करून ठेवली आहे, हा विचार आधी त्यांनी करावा. आदित्य ठाकरे यांना आता टीका करण्याशिवाय काही काम उरलेले नाही. आम्ही नागरिकांमध्ये जाऊन काम करतो. म्हणूनच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांसह आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर एकसाथ काम करत आहोत. त्यामुळे इतरांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतः च्या घरात काय जळत आहे हे आधी पाहावं, असा टोला लगावत आदित्य ठाकरेंनी केलेले टीकेला मुख्यमंत्र्यानी प्रत्युत्तर दिले आहे.
विदर्भात महायुतीला चांगलं वातावरण असून या ठिकाणी महायुतीतील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केला. सोबतच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये उरलेल्या जागांचा निर्णय होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महायुतीकडून सभांचा धडाका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी हजेरी लावणार आहे. दरम्यान, आज संध्याकाळी नागपूर लोकसभा मतदारसंघात दक्षिण-पश्चिम विधानसभा परिक्षेत्रात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांची प्रचार यात्रा निघणार आहे. तर उद्या चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकरता प्रचार सभा होणार आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 8 एप्रिलला नागपूर, वर्धा आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या