Eknath Shinde : 'अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा गौरव', मुख्यमंत्री शिंदेंनी केले लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले आहे.
मुंबई : अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे ही आनंददायी बाब आहे, अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Awrad) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे.
यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, प्रखर राष्ट्रभक्त आणि जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे. उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचे आभार मानले आहेत.
अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे #भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले… pic.twitter.com/JzJuuAv9Rs
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 3, 2024
पंतप्रधान मोदींनी केली घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला असल्याची घोषणा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, मला सांगण्यास आनंद होतो की एल के अडवाणीजींनी भारतरत्न जाहीर झाला आहे. मी अडवाणींशी बोललो आणि त्यांचं अभिनंदन केले. अडवाणी हे या काळातील सर्वाधिक आदरणीय नेते आहेत.
कोण आहेत लालकृष्ण अडवाणी? (Who Is Lal Krishna Advani)
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि 1974 साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणिबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1977 साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. 1980 साली भारतीय पक्षाची स्थापना झाली आणि लालकृष्ण अडवाणी हे त्याच्या संस्थापकांपैकी एक नेते होते. 1998 साली भाजपची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. तर 2002 ते 2004 या दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान बनले. 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.