25 November : मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा, संजय राऊतांच्या संबंधित ईडीच्या याचिकेवर सुनावणी; आज दिवसभरात
Todays Headline 25 November : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
मुंबई : आधुनिक महाराष्ट्राचे जनक असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहेत. तसेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. जाणून घेऊया यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.
मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर
आज महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कराडमधील प्रितीसंगमावर जाऊन यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू पक्षी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाला चे उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यानंतर कोल्हापुरातल्या शिरोळला एक कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार आहेत.
जालन्यातील समर्थांच्या राम मूर्तीचा आजपासून पुनर्स्थापना सोहळा
जालना जिल्ह्यातील समर्थांच्या राम मूर्तीचा आज पुनर्स्थापना सोहळा होणार आहे. ऑगस्ट महिन्यात या मूर्तींची चोरी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मूर्ती हस्तगत केल्या. त्याचा आजपासून दोन दिवस पुनर्स्थापन सोहळा होणार आहे. आज राम मूर्तींची मिरवणूक निघणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या नंतर उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबरला राम मूर्तीची पुनर्स्थापना केली जाणार आहे.
संजय राऊतांच्या संबंधित ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
नागपूरमध्ये अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन
नागपूरमध्ये आज ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, नितीन गडकरी आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.
नीलम गोऱ्हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता विविध विषयांवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चिखली येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या मैदानाची पाहणी करतील.
नवनीत राणांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणीच्या वॉरंटवर सुनावणी
बनावट जातपडताळणी प्रमाणपत्राचा आरोप असलेल्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात बजावलेल्या वॉरंटवर शिवडी कोर्टात आज सुनावणी करण्यात येणार आहे. राणा यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.