मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखे दिसणा-या विजय मानेची हायकोर्टात धाव, गुन्हा रद्द करण्याची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा, दाढी आणि कपडे परिधान करून हुबेहुब सीएम एकनाथ शिंदे बनून फिरणा-या विजय माने यांचा फोटो सराईत गुन्हेगारासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याला मिळाली.
मुंबई : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासारखा हुबेहुब दिसणा-या विजय मानेनं हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली आहे. कारण त्याच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत विजय मानेनं (Vijay Mane) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याच्या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा, दाढी आणि कपडे परिधान करून हुबेहुब सीएम एकनाथ शिंदे बनून फिरणा-या विजय माने यांचा फोटो सराईत गुन्हेगारासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर सोमवारी पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी खंडणी विरोधी पथक दोनच्या अधिका-यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली असता पोलिसांना एक फोटो मिळाला. त्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचं दिसत आहे.
याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांचं रूप घेऊन फसवल्याच्या आरोपात विजय नंदकुमार मानेविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेनं कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) या कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका माने यांनी अॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली आहे. पोलिसांनी विजय माने याच्याविरोधात केलेली कारवाई प्रथमदर्शनी अत्यंत उत्साहाच्या भरात केलेली, चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर विजय माने यांची देखील चर्चा सुरु झाली. विजय माने हे मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करुन वावरायचे. त्यांना अनेक कार्यक्रमांसाठी देखील आमंत्रणं मिळायची. गणपतीच्या काळात त्यांचे डान्स करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या परिसरातील प्रश्न देखील मांडले होते.