लक्ष्मण हाकेंच्या उशाला बसून विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, उद्याच्या उद्या शिष्टमंडळ पाठवणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन
Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे, लक्ष्मण हाकेंनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
जालना: मराठा आरक्षण (Maratha Reservation) देताना आपण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असं आश्वासन देत शुक्रवारी दोन मंत्र्यांचे शिष्टमंडळ उपोषणकर्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake Protest) यांच्या भेटीला येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलं. गेल्या सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले असून त्यांच्या भेटीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गेले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं.
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे गेल्या सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. त्यांच्या भेटीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गेले होते त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून त्या ठिकाणच्या परिस्थितीची जाणिव करून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दोन मंत्र्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार असल्याचं आश्वासन दिलं. हाके यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याची आपण काळजी घेतली आहे असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
तुम्ही आश्वासन द्या, तुमचेच मंत्री गिरीश महाजन म्हणालेत सगेसोयऱ्यांचा विषय न्यायालयात टिकणार नाही असं विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.
उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना विजय वडेट्टीवार यांनी पाणी पिण्याचा आग्रह केला. त्यानंतर दोन्ही आंदोलकांनी पाणी घेतलं.
विजय वडेट्टीवार भावुक
लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेले विजय वडेट्टीवार यावेळी काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. ते म्हणाले की, "ओबीसींच्या मागे उभे राहणे हे माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सत्ता येते आणि जाते, पदाचा मी कधीच विचार केला नाही. हे छत्रपती शिवरायांचे, शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे. या पुरोगामीत्वाला धक्का लावण्याचे काम 2014 साली सुरू झालं. सरकारचे शिष्टमंडळ उद्या येणार आहे. लक्ष्मण हाकेंना पूर्ण अभ्यास आहे. सगेसोयऱ्यांचा विषय न्यायालयात टिकणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय, मग त्याचा अध्यादेश कशाला काढताय. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दोन समाज एकमेकांविरोधात उभे राहिले असून सामाजिक सलोखा उद्ध्वस्त होत आहे."
आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला.
ही बातमी वाचा: