Vijay Wadettiwar: फडणवीस सरकार राज्यातील सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करतंय, सत्तेच्या लालसेपोटी आश्वासन दिलं: विजय वडेट्टीवार
Maharashtra Politics: लोकांचे पक्ष फोडा, यंत्रणांचा गैरवापर, हे सोडून यांना काहीच कळत नाही. परीक्षेचे पेपर फुटतात त्याच्या खोलापर्यंत यांना जाता येत नाही. नीटमध्ये गोंधळ झाला. उद्या भलतेच MBBS झाले तर भविष्यात काय होईल?, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
अहमदनगर: राज्यातील सामाजिक सलोखा उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीसांचे सरकार करत आहे. सत्तेच्या लालसेपोटी विविध समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते समाजासमाजात आग लावत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केले. ते गुरुवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. संविधानात जे आरक्षण ओबीसींना मिळालं आहे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे, अशी हाके यांची मागणी आहे. राज्य सरकारने एक माचिसची काडी टाकून महाराष्ट्रात आग लावली आहे. आग लावता येते, मात्र विझवायला वेळ जातो. सरकार मराठा आणि ओबीसी दोघांनाही फिरवण्याचे काम करत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. या सगळ्यावरचा रामबाण उपाय एकच जातीनिहाय जनगणना करणे. 'जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी', असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
मनोज जरांगेंच्या आरोपांवर वडेट्टीवारांचं भाष्य
लक्ष्मण हाके यांच्याकडून जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरु आहे. मात्र, हे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. यावर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, मनोज जरांगे हाकेंच्या आंदोलनाला सरकार पुरस्कृत बोलणार असतील तर मी त्यावर काहीही बोलणार नाही. हाके यांना समाजाच्या प्रश्नाची जाण आहे. हाके यांच्या आंदोलनाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षात नव्हते, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरुन वडेट्टीवारांची सरकारवर टीका
दुष्काळ आणि अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी होरपळला आहे. 2022 पासून एका रुपयाची मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. काही प्रमाणात बीड जिल्ह्यात मंत्र्यांच्या लोकांना याचा फायदा झालाय. याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत. राज्यात बियाणे आणि खतांचे दर वाढलेत. हे सरकार फक्त हमीभावाच्या थापा मारत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
शक्तीपीठ महामार्गावरुन वडेट्टीवारांचे सरकारवर गंभीर आरोप
शक्तीपीठ महामार्ग हा पैसा खाण्याचा धंदा आहे. समृध्दी महामार्गात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पैसे खाल्ले. जमिनी विकून पैसा कमवायचा, हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हे सगळे चोर मिळून महाराष्ट्राला उद्ध्वस्त करतायत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
आणखी वाचा
मफलर आडवी टाकून तिकडे बसतो आणि वाद लावून देतो; मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल