महापरीक्षा पोर्टल तात्काळ बंद करावं, रोहित पवारांची विधानसभेत मागणी
एमपीएससीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाव्यात, कारण महापोर्टलमध्ये प्रचंड घोळ आहे, रोहित पवारांनी विधानसभेत सांगितलं.
नागपूर : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा बंद करुन महापोर्टलही तात्काळ बंद करावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी महापोर्टलला स्थगिती दिली असली तरी महापोर्टलही तात्काळ बंद करावे, अशी मागणी रोहित पवारांनी केली. मुख्यमंत्र्यांनी महापोर्टलला स्थगिती दिली त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, तोपर्यंत महापोर्टलला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
महापोर्टल बंद करा आणि परीक्षा पद्धतही बंद करावी. एमपीएससीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाव्यात, कारण महापोर्टलमध्ये प्रचंड घोळ आहे. महापोर्टलचं ज्या कंपनीला कंत्राट दिलं आहे, त्याच्या शासन आदेश आणि निविदेत मोठी तफावत आहे, अशी माहितीही रोहित पवार यांनी सभागृहात दिली.
महापोर्टलने घेतलेल्या परीक्षेदरम्यानची सीसीटीव्ही फुटेज टेप मिळत नाही. वनविभागाच्या परीक्षेत उमेदवारांची शारीरिक क्षमता न बघता केवळ लेखी परीक्षेद्वारे नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या पोर्टलचा कारभार योग्यरित्या सुरु नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत एक बैठक बोलवावी व तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
राज्य सरकारतर्फे शासकीय नोकरभरतीसाठी सुरु करण्यात आलेले 'महापोर्टल' बंद करण्याची मागणी याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा, असंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं.
महायुती सरकारच्या काळात ही महापोर्टल सेवा सुरु करण्यात आली होती. राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी महापोर्टलविषयी सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली होती. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महापोर्टलविरोधात आंदोलनं झाली आहेत. मागील सरकारने सुरु केलेले हे महापोर्टल बंद करुन पूर्वीप्रमाणेच नोकर भरतीसाठी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली होती.
संबंधित बातम्या