D. Y. Chandrachud : न्यायालयात कोणती सुनावणी करावी हे एखादा पक्ष ठरवणार का? माझ्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय; माजी सरन्यायाधीश चंद्रचूडांचं राऊतांना प्रत्युत्तर
D. Y. Chandrachud: सरन्यायाधीशांनी जर योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं असं संजय राऊत म्हणाले होते. सरन्यायाधीशांनी पक्षांतर बंदी कायद्याची भीती घालवली असा आरोपही त्यांनी केला.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात कोणत्या याचिकेवर सुनावणी करावी हे एखादा राजकीय पक्ष ठरवणार का असा सवाल विचारत माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. आपल्या काळात अनेक महत्त्वाच्या खटल्यांवर निकाल देण्यात आल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्रात जे घडलं त्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका विधानसभेच्या निकालानंतर संजय राऊतांनी केली होती. त्या टीकेला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलंय.
आपल्या कार्यकाळात नऊ सदस्यीय खंडपीठ आणि सात सदस्यीय खंडपीठाने महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय दिले. एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी. मला माफ करा, पण हा अधिकार सरन्यायाधीशांकडे असतो असं प्रत्युत्तर चंद्रचूड यांनी दिलंय. माझ्या कार्यकळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला. तो काही कमी महत्त्वाचा होता का? असा प्रती सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
Sanjay Raut On CJI D Y Chandrachud : काय म्हणाले होते संजय राऊत?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "महाराष्ट्रातील या घडामोडींना जबाबदार जर कोणी असेल ते सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत. देशाचे सुप्रीम कोर्ट ज्याने आमदार आपात्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता, ते त्यांनी केलं नाही. मग तुम्ही कशासाठी बसला आहात खुर्चीवर? जर निर्णय नाही द्यायचा तर खुर्च्या का उबवतात? सरकारवर ओझं म्हणून का बसला आहात? जनतेच्या पैशाचा तुम्ही चुराडा करत आहात. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय चंद्रचूड हे लेक्चर देण्यासाठी प्रोफेसर म्हणून चांगले आहेत मात्र सरन्यायाधीश म्हणून नाहीत."
सर न्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक विषयांवर निर्णय देणे अपेक्षित होते. सरन्यायाधीश म्हणून ते निर्णय देऊ शकले नाहीत त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही असं संजय राऊत म्हणाले होते. ते म्हणाले होते की, "चंद्रचूड यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रात चित्र बदललं असतं. त्यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराची दारं खिडक्या उघड्या ठेवल्या आहेत. आता देखील कोणीही कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल. कायद्याची भीती राहिली नाही. न्यायमूर्तींनी ती भीती घालवली. तुम्ही खुशाल पक्षांतर करा आम्ही इथे बसलेलो आहोत असा त्यांनी संदेश दिला. या सगळ्या घटनांना सरन्यायाधीश चंद्रचूड हेच जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहलं जाईल."
ही बातमी वाचा: