(Source: ECI/ABP News/ABP Majha)
45 वर्षापुढील सर्वांचं सरसकट कोविड लसीकरण करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी
राज्यातील लसीकरण प्रमाण व आरटीपीसीआर चाचण्यांबाबत केंद्राचे समाधान, पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचा केला स्वीकार
मुंबई : वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी काही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणे करून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अत्यंच महत्त्वाची मागणीवजा विनंतीही पंतप्रधानांकडे होती.
४५ वयापुढील सर्वाना लस देण्याची विनंती
कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर कोरोना झाल्याच्या काही घटना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या तसेच राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्याजोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
राज्यात हाफकिन लस उत्पादन करणार, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला पंतप्रधानांचा हिरवा कंदील
संपर्क शोधण्याचे आव्हान पेलणार
पहिल्यांदा जेव्हा माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात अली तेव्हा बहुतांश टाळेबंदी होतीआणि त्यामुळे रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीतजास्त संपर्क शोधणे सोप्पे होते कारण सर्व परिवार आणि शेजारीपाजारी घरी असायचे. मात्र आता सर्व व्यवहार सुरु झाल्याने आणि नियमांमध्ये शिथिलता आल्याने कोरोना रुग्णांचे संपर्क शोधणे विशेषतः मुंबईसारख्या महानगरांत आव्हानात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तरीदेखील सर्व आरोग्य व पालिका यंत्रणांना परत एकदा युद्ध पातळीवर संपर्क शोधण्याचे काम हाती घेण्यास सांगण्यात येईल असेही ते म्हणाले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य सचिव व मुख्यमंत्री सचिवालयातील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.