मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजन साळवींवर नाराज; ''साळवींची 'ती' भूमिका वैयक्तिक''
नाणारबाबत केलेल्या विधानावर साळवींचे कान पक्षश्रेष्ठींनी उपटले आहेत. त्यांच्या या विधानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे.
रत्नागिरी : नाणारवरून पुन्हा एका जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी निमित्त ठरलं ते शिवसेनेचे लांजा - राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी केलेल्या विधानाचं. 'सध्या कोकणात उद्योग - धंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल' असं विधान राजन साळवी यांनी 'एबीपी माझा'शी मुंबई येथे बोलताना केलं होतं. पण, साळवी यांना हे विधान चांगलंच महाग पडलं आहे. कारण 'राजन साळवींचं ते विधान वैयक्तिक असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, तसेच शिवसेनेचे रत्नागिरी - सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवींचं ते विधान वैयक्तिक असल्याचं स्पष्ट केले आहे.
नाणारबाबत केलेल्या विधानावर साळवींचे कान पक्षश्रेष्ठींनी उपटले आहेत. त्यांच्या या विधानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. रिफायनरी हा विषय कायमचा संपला आहे. राजन साळवींचं विधान वैयक्तिक आहे. शिवसेना, महाविकास आघाडी साळवींच्या विधानाशी सहमत नाही असं खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे या मुद्यावर राजन साळवी पुन्हा एकदा एकटे पडल्याचं दिसून येत आहे. शिवाय, राजन साळवी यांना अशा प्रकारचं विधान भविष्यात जड जाऊ शकते अशी चर्चा देखील जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना घेणार पत्रकार परिषद
राजन साळवींनी केलेल्या विधानावरून शिवसेनेतून देखील वेगानं सुत्र हलली. यानंतर जिल्ह्यातील नेत्यांना याबाबत फोन आले आहेत. याबाबत शिवसेना पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा 'नाणार विषय शिवसेनेसाठी संपला' हे जाहीर करेल. आमदार राजन साळवींचं हे मत वैयक्तिक होतं. याबाबत पत्रकार परिषदेत शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करेल अशी माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. रत्नागिरी येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेत आमदार राजन साळवी देखील हजर राहणार आहेत.
काय म्हणाले फडणवीस?
आमदार राजन साळवी यांनी केलेल्या विधानावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. जैतापूरमध्ये नेमका कुणाला मोबदला मिळाला हे पाहावं लागेल असा सवाल त्यांनी केला आहे. कुणालाही मोबदला मिळाला असलं तरी भूमिका बदलली याचा आनंद आहे. नाणारमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा देण्याची लोकांची तयारी आहे. केवळ काही लोकांचा विरोध आहे म्हणून शिवसेना विरोध करत आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचं, कोकणचं भवितव्य बदललं असतं. जवळपास अडीच लाख कोटींची गुंतवणूक तिथं होणार आहे. राज्याच्या तिजोरीत यामुळे कोट्यावधी रूपये आले असते. ज्याप्रमाणे मोबदला मिळाला म्हणून जैतापूरमध्ये लोकं तयार झाली त्याप्रमाणे नाणारबाबत देखील होईल असा विश्वास वाटत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Nanar Project | नाणारसाठी शिवसेना सकारात्मक? देवेंद्र फडणवीस म्हणतात...