(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश
Ganesh Chaturthi 202 : द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि टोल नाक्यावरील होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganesh Chaturthi 2022) जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिले आहेत. खालापूर टोलनाक्याला भेट दिल्यानंतर याठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
विकेंड, सण-उत्सवाच्या निमित्ताने मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर कायमच वाहनाच्या रांगा पाहायला मिळतात. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि टोल नाक्यावरील होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
वाहतूक कोंडीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
साताऱ्याहून मुंबईकडे परतताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिल्यानंतर त्यांनी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली. याभागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुख्यमंत्र्यानी आढावा घेतला. महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली. आज दुपारी त्यांनी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्यालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. याभागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्यांनी आढावा घेतला. गणेशोत्सव, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या काळात याठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवर ट्रॅफिक वॉर्डन त्याचबरोबर टोल वसूल करण्यासाठी आवश्यक ते स्कॅनिंग मशिन्सची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.
सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात असे सांगत वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी यंत्रणेने जलदगतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णायाची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत आहे. 11 सप्टेंबरपर्यंत या गणेशभक्तांना टोल माफी मिळणार आहे. तसेच 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय ममहामार्ग-48), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय ममहामार्ग 66) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यावर गणेशभक्तांसाठी कोणताही टोल आकारला जाणार नाही