Eknath Shinde : फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
Eknath Shinde On Uddhav Thackeray : फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल बुलढाण्यातील चिखली येथे केलेल्या भाषणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरे यांची कालची सभा संपताच शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना खोके कोणी घेतले हे वेळ आल्यावर सांगू असा इशारा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील उद्धव ठाकरे यांना असाच इशारा दिलाय. फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.
बुलढाण्यातील चिखली येथे काल उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर टीका केली. खरच तुम्ही खोके घेतले असतील तर त्यातील थोडे शेतकऱ्यांना देखील द्या. तुम्ही खोके घेतलेत हे मी म्हणत नाही, तर तुमच्याच गटाचे आमदार सांगत आहेत. बच्चू कडू यांनी देखील सांगितलं की लग्नाला गेलो तरी लोक खोक्यावरून बोलतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यांच्या सभेनंतर लगेच दीपक केसरकर यांनी खोके कोठे गेले हे वेळ आल्यावर सांगू असा इशारा दिला होता. खोटं बोलण्याची मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडू नका. नाही तर आम्ही देखील तोंड उघडू आणि फ्रिजच्या बॉक्समधून कोठे काय गेले हे बाहेर काढू, असे केसरकर यांनी म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत आज मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील फ्रिजमधून खोके कोठे गेले याचा शोध घेणार असल्याचे म्हटले आहे.
"धक्क्यावर धक्के बसत असल्यामुळे उद्धव ठाकरे अशी वक्तव्य करत आहेत. परंतु, आम्ही 'फ्रिजमधल्या खोक्यां'चा शोध घेणार आहे. कंटेनरमधील मोठे खोके फ्रिजमधून कोठे गेले? आणि एवढे मोठे खोके घेण्याची कोणाची ऐपत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. एक दिवस हे सर्व समोर येईल, असा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
"तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. परंतु, मिंधे सरकार कडून काही अपेक्षा नाही. तुम्ही खोके घेतलेत हे आम्ही म्हणत नाही. तुमचेच आमदार सांगतर आहे. बच्चू कडू यांनी या आधी देखील सांगितलंय की, कोणाच्या लग्नात गेलो तरी लोक खोक्यावरून बोलत आहेत. परंतु, हे खोके पचणार नाहीत. जनता याची भरपाई करेल. आम्ही तुम्हाला सोडलेले नाही. बोक्यांना खोक्यांची भूक होती म्हणून गद्दारी करुन हे गेले. काय कमी केले होतं तुम्हाला? या गोरगरिबांनी तुम्हाला निवडून दिले. आज तात्पुरती सत्ता आहे. परंतु, देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायम राहिल. ही ओळख पुसता येणार नाही." असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या