'धनगर नेतृत्व कुचकामी! आता दोन्ही छत्रपतींनी धनगर आरक्षणासाठी नेतृत्व करावे', धनगर आरक्षण कृती समितीची मागणी
धनगर आरक्षणातील नेते स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापुरता धनगर समाजाचा वापर करत असून आता धनगर आरक्षण प्रश्नाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार छत्रपती उदयनराजे यांनी करावे अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीने पंढरपूर येथील बैठकीत केली आहे.
पंढरपूर : धनगर आरक्षणातील नेते स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापुरता धनगर समाजाचा वापर करत असून आता धनगर आरक्षण प्रश्नाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार छत्रपती उदयनराजे यांनी करावे अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीने पंढरपूर येथील बैठकीत केली आहे. येत्या दोन दिवसात धनगर समाजाचे नेते छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घेऊन आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आज पंढरपूर येथे झालेल्या समाजाच्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर व इतर नेत्यांवर निशाणा
मराठा समाजासाठी जे दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यात धनगर समाजाच्या आरक्षणाचाही समावेश करून याचा निर्णय करावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंना केली जाणार आहे. धनगर समाजाचे आजवरच्या नेत्यांनी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधल्यावर धनगर आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असे सांगत समाजाच्या नेत्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व इतर नेत्यांवर निशाणा साधला. धनगर समाजाच्या नेत्यांकडून आमचा भ्रमनिरास झाल्याने आता मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या संभाजी महाराज यांनीच धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी परमेश्वर कोळेकर यांनी केली.
.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीची महापूजाही करू देणार नाही!
छत्रपतींनी अठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्य स्थापन केले होते . तुम्ही छत्रपतींचे वंशज असून नुसत्या मराठा समाजाचा विचार न करता धनगर समाजाचाही विचार करावा असे शालिवाहन कोळेकर यांनी सांगितले. आमच्या समाजाला घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचे आश्वासन शरद पवार यांनी आम्हाला दिले होते. मात्र नंतर कोरोना सुरु झाल्याने आमचा विषय मागे पडला. यावरही आमच्या समाजाचा विचार न झाल्यास राज्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांना सळो की पळो करून सोडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीची महापूजाही करू देणार नाही असा इशारा शालिवाहन कोळेकर यांनी दिला. आता धनगर आरक्षण कृती समितीच्या या भूमिकेवर धनगर समाजातील प्रस्थापित नेते काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.