3600 कोटींच्या पुतळ्यापेक्षा महाराजांचे किल्ले जपा, शिवरत्न शेटेंच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या
महाराजांचे रक्षण करणारे किल्ले आणि शत्रूच्या चिंधड्या उडवणाऱ्या तोफा आज शेवटच्या घटका मोजत आहेत. निकृष्ट दर्जाचे पुतळे बनवण्यापेक्षा महाराजांचे हे किल्ले जपा, असे आवाहन डॉ. शिवरात्न शेटे यांनी केले आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज... (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्राचं आराध्य दैवत... पण याच देवताची आज माफी मागायची वेळ येऊन ठेपलीय.. कारणही तसंच आहे... मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळलाय.. या दुर्दैवी घटनेनंतर आरोप- प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे. मात्र या घटनेनंतर अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात घडलेल्या घटनेनंतर बोलताना शिवव्याख्याते डॉ. शिवरात्न शेटे यांना अश्रू अनावर झाले. तसेच कोट्यवधी रुपयांचा खर्च करून निकृष्ट दर्जाचे पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या गडकिल्यांचे संवर्धन करा, असे भावनिक आवाहन हात जोडून डॉ. शिवरात्न शेटे यांनी सरकारला केले आहे.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं लोकार्पण केलं..प्रत्येक शिवप्रेमींचा ऊर त्यावेळी अभिमानानं भरून आला. मात्र आज त्याच शिवरायांसमोर मान शर्मेनं खाली घालण्याची वेळ ओढवलीय. अवघ्या 8 महिन्यांत राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलाय. एकीकडे महाराष्ट्राच्या आराध्य देवताचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत
शत्रूच्या चिंधड्या उडवणाऱ्या तोफा आज शेवटच्या घटका मोजतायत : डॉ. शिवरत्न शेटे
डॉ. शिवरात्न शेटे म्हणाले, आपण महाराजांना पाहिलं नाही, मात्र या गडकिल्ल्यांनी महाराजांना पाहिलंय, वेळ प्रसंगी महाराजांच्या जीवाचं रक्षण देखील त्यांनी केलं आहे. मात्र आज महाराजांचे रक्षण करणारे किल्ले आणि शत्रूच्या चिंधड्या उडवणाऱ्या तोफा आज शेवटच्या घटका मोजत आहेत. निकृष्ट दर्जाचे पुतळे बनवण्यापेक्षा महाराजांचे हे किल्ले जपा.
छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणामंत्र : डॉ. शिवरत्न शेटे
पुतळ्याला विरोध नाही. कारण हेच पुतळे प्रेरणा देत असतात पण ते उत्कृष्ट दर्जाचे पाहिजे. कोट्यवधी रुपयाचे निकृष्ट दर्जाचे पुतळे उभारण्यापेक्षा तेच 3600 कोटी रायगडला लावले असते तर चित्र वेगळे असते. आज महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची दूरावस्था झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणामंत्र आहे. किल्ल्याची दूरावस्था पाहिली की हृदयाला वेदना होतात. त्यामुळे महाराजांच्या गडकिल्यांचे संवर्धन करा , असे सोलापूरचे ‘शिवचरित्र’कार डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले आहे.
हे ही वाचा :
Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा 96 वर्षानंतरही दिमाखात उभा, पुण्यातील शिवरायांच्या पुतळा निर्मितीची प्रेरणादायी गोष्ट