गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा; संभाजीराजेंची मागणी
संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje )यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा, अशी मागणी केली आहे.
Chhatrapati Sambhajiraje : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje )यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा, अशी मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात विजयदुर्गची तटबंदी ढासळली होती. पन्हाळगडची तटबंदी अथवा बुरुज ढासळणे, हे तर नेहमीचेच झाले आहे. यावर ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मी झटत आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन व भरीव योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी माझी गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही मागणी आहे की, राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 17, 2022
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय की, केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करून विजयदुर्ग तटबंदीचे काम सुरू करण्यास मंजुरी आणली होती. विशाळगडाच्या तटबंदी संवर्धनाचे काम सुरू केले आहे. रांगणा किल्ल्यासाठी भरीव निधी आणलेला आहे. पन्हाळगडच्या संवर्धनासाठी देखील मी पाठपुरावा करीत आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दुर्गराज रायगडच्या जतन संवर्धनाचे काम जोमाने सुरू आहे. रायगड प्राधिकरणच्या धर्तीवर केंद्राच्या ताब्यात असणारे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा, शिवनेरी यांसारखे किमान 10 महत्त्वाचे किल्ले सामंजस्य कराराद्वारे राज्य सरकारकडे देण्यात यावेत, यासाठी सदैव प्रयत्न केले.
15 व्या वित्त आयोगामार्फत गडकोटांसाठी भरीव निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला, ज्याला केंद्राकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. इतक्या वर्षांच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे केवळ तात्पुरते उपाय करून आणि जुजबी डागडुजी करून गडकोटांचे संवर्धन होणार नाही. हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन व भरीव योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी माझी गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही मागणी आहे की, राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी. विद्यमान राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, ही एक दुर्गप्रेमी म्हणून मी मागणी करीत आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.