Chhagan Bhujbal : मला गोळी मारली जाऊ शकते, भर सभागृहात छगन भुजबळांचा खळबळजनक दावा, पोलिसांच्या रिपोर्टचा दाखला
Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये किती प्रतिनिधित्व मिळतं याची आकडेवारी राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी विधानसभेत मांडली.
मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणतात की माझा कार्यक्रम केला जाणार, मला गोळी मारली जाऊ शकते असा खळबळजनक दावा भुजबळांनी केला. त्यासाठी त्यांनी पोलिसांच्या रिपोर्टचा दाखलाही दिला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे, मग फक्त भुजबळच टार्गेट का होतोय असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केला. त्यातून भुजबळ हा मराठा समाजाचा विरोधक आहे अशी प्रतिमा निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
छगन भुजबळ म्हणाले की, "मी आता त्याचा कार्यक्रम करतो असं मनोज जरांगे म्हणतात. म्हणजे माझा कार्यक्रम करणार. त्यानंतर अचानक माझी पोलीस सुरक्षा वाढवली. मी कारण विचारलं असता वरून इनपूट आल्याचं सांगण्यात आलं. मला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. त्यामुळे सुरक्षा वाढवली."
भुजबळ मराठा विरोधक अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न
छगन भुजबळ म्हणाले की, भुजबळ मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा तयार केली जात आहे. मला सर्वच समाज समान आहे. भुजबळ हा मराठा विरोधक म्हणून प्रतिमा तयार केली जात आहे. मराठा आरक्षणाचा कायदा दोन वेळा आणण्यात आला, त्याला मी पाठिंबा दिला. ओबासी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं सर्वजण बोलतात, मात्र मग भुजबळच टार्गेट का?
सारथीला सर्व ठिकाणी कार्यालय दिले त्यासाठी 1 रुपया चौरस फुटाप्रमाणे भाडे आकारले, मग ओबीसींसाठी महाज्योतीला 28 कोटी भरायला सांगितले असं भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियुक्ती केलेल्या जागांमध्ये 75 टक्के मराठा समाजाचे विद्यार्थी असल्याचं भुजबळांनी सांगितलं. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1000 कोटी रुपयांचा निधी आहे तर ओबीसी महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या तरुणांना जे देता, ते ओबीसी समाजाला द्या एवढच तर आमचे म्हणणे आहे असंही ते म्हणाले.
सरकारी नोकरीमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण आहे, प्रतिनिधीत्व मात्र 9.50 टक्के आहे, ते आरक्षण आम्हाला द्या असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधित्वाची आकडेवारी मांडली,
मराठा समाजाला लोकसेवा आयोगातील प्रतिनिधित्व (Maratha in UPSC Service)
- ए ग्रेड - 33.50 टक्के
- बी ग्रेड - 29 टक्के
- सी ग्रेड - 37 टक्के
- डी ग्रेड - 36 टक्के
- IAS - 15.50 टक्के
- IPS - 28 टक्के
- IFS - 18 टक्के
मंत्रालय कॅडरमध्ये
- ए ग्रेड - 37.50
- बी ग्रेड - 52.30
- सी ग्रेड - 52
- डी ग्रेड - 55.50 टक्के