Maratha Reservation Bill : 'जरांगे मला धमक्या देतात', छगन भुजबळ आक्रमक, मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर सभागृहात गदारोळ
Chhagan Bhujbal : सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर होताना मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Chhgan Bhujbal : मराठा आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) विधेयक विधीमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. आता मराठा समाजाला नोकरीत तसेच शिक्षणात १० टक्के आरक्षण मिळणार आहे. एकीकडे सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर होताना दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही. मात्र जरांगे मला धमक्या देतात. जरांगेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आईवरुन शिव्या दिल्या. या दादागिरीला अटकाव करणार आहे की नाही.
अशी दादागिरी चालणार नाही - छगन भुजबळ
एसपी, अधिकाऱ्यांना भाडखाऊ तो म्हणतो, अशी दादागिरी चालणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच भुजबळांना बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिक वेळ दिला नाही, त्यावरून भुजबळ चांगलेच आक्रमक झाले होते. भुजबळांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, तुमच्या चिंतेंबाबत मी नोंद घेतली आहे, सरकारने याबाबत उचित उपाययोजना करावी, असे त्यांनी म्हटले.
बाळासाहेब म्हणायचे शब्द दिला की तो पूर्ण करायचा - एकनाथ शिंदे
मी दसरा मेळाव्यात शपथ घेतली होती की, मी ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. आज ते प्रत्यक्षात येत आहे. मराठा समाज अडचणीत आला होता. त्यांच्यावरील अनन्या दूर करण्यासाठी आम्ही कोणालाही धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने आरक्षण देणार हा शब्द दिला होता. बाळासाहेब ठाकरे देखील म्हणायचे शब्द दिला की तो पूर्ण करायचा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाने गुलाल उधळला
मराठा समाजाकडून विधान भवनासमोरच जल्लोष केला जात आहे. फटाके फोडून, ढोल ताशा वाजवून गुलाल उधळला जात आहे. मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले जात आहे. हे आरक्षण टिकावे यासाठी कोर्टात देखील वकिलांची फौज उभी करा, अशी अपेक्षा मराठा समाजाने व्यक्त केली आहे.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
हे आरक्षण एका मराठा कार्यकर्त्याने लिहिलेल्या अहवालावर दिलेले आहे. ते कायद्याच्या आधारे टिकणारे नाही. याला लवकरच हायकोर्टात आव्हान देणार आहोत. राज्यातील आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. मराठा आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. मराठा समाज हा कोणत्याही अनुषंगाने मागास नाही, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरूय, मराठा समाजानं जागरूक राहावं; राज ठाकरेंचा इशारा