Ice Cream: स्वस्तात मस्त आईसक्रीम खाल्लंय का? केवळ दोन रुपयांमध्ये घ्या आईसक्रीमच्या अनेक फ्लेवरचा आनंद
चेन्नईतील इग्लू आईसक्रीम पार्लरमध्ये केवळ दोन रुपयांमध्ये आईसक्रीम मिळत असून त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभतोय.
चेन्नई: तुम्ही जर आईसक्रीम प्रेमी असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही कधी स्वस्तात मस्त आईसक्रीम खाल्लय का? चेन्नईमध्ये केवळ दोन रुपयांमध्ये अनेक फ्लेवरचे आईसक्रीम मिळतात. इग्लू आईसक्रीम पार्लर असं या दुकानाचं नाव असून त्याला ग्राहकांचा तुंबड प्रतिसाद मिळतोय. या आईसक्रीमचे मालक व्ही विनोद यांनी सांगितलं आहे की या विक्रीतून त्यांना कोणतेही मार्जिन मिळत नाही.
या दुकानाचे मालक व्ही विनोद यांनी सांगितलं की, "आम्ही या दुकानात केवळ दोन रुपयांमध्ये अनेक फ्लेवरचे आईसस्क्रीम विकतो. यामध्ये आम्हाला कोणतेही मार्जिन मिळत नाही, आर्थिक नफा होत नाही. पण लोक हे आईसक्रीम खाताना त्याचवेळी दुकानातून केक, ब्राऊनी आणि मिठाईंची खरेदी करतात. त्यामुळे या पदार्थांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अप्रत्यक्षपणे त्यामुळे दुकानाचा मोठा फायदा होत असल्याचं समोर आलं आहे."
केवळ दोन रुपयांमध्ये आईसक्रीम मिळत असल्याने या दुकानासमोर लहान मुलांची मोठी गर्दी जमते. लहान मुलं दोन रुपयांचे नाणे घेऊन दुकानात येतात आणि आईसक्रीम खरेदी करतात. तसेच अनेक लोक आपल्या नंबराची वाट पाहत असतात.
भारतात या वर्षी उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून थंडगार पेयाच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. तसेच एका अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भारतामध्ये आईसक्रीमच्या खपात एकूण 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.
व्ही विनोद यांनी हा व्यवसाय 2008 साली सुरू केला होता. आईसक्रीमच्या विक्रीतून आज त्यांना रोज जवळपास 50 हजार रुपयांचा नफा होतोय. त्यामध्ये दोन रुपयांचे जवळपास 1500 आईसक्रीम खपतात.
महत्त्वाच्या बातम्या;