Aurangabad Crime: प्रियेसीचे लग्नापूर्वीचे अश्लील फोटो प्रियकराने केले व्हायरल; पोलिसात गुन्हा दाखल
पिडीत मुलीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा जुना प्रियकर तिला लग्न करण्यासाठी सतत त्रास देत होता.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या एमआयडीसी वाळूज पोलिसात एका प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय विवाहितेचे लग्नापूर्वी सोबत काढलेले फोटो समाजमाध्यमांवर टाकून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
वाळूज महानगर परिसरात वास्तव्यास असलेली 19 वर्षीय तरुणी गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात राहणाऱ्या मामाच्या गावाकडे गेली होती. दरम्यान तिची ओळख तिथे रहाणाऱ्या सुधाकर गजानन निकम तरुणासोबत झाली. पुढे मैत्री आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनतर मुलगी आई-वडिलांकडे वाळूजला पुन्हा परत आली. पण त्यांनतरही दोघेही मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात राहत. तसेच प्रियकर अधूनमधून तिला भेटण्यासाठी वाळूजला येत असे. दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यावेळी सुधाकरने दोघांचे खासगी क्षणाचे फोटो व व्हिडिओ मुलीला नकळत काढले.
पुढे मुलीच्या वडिलांनी सुधाकरचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने त्याने ते फोटो व्हिडीओ त्यांना व्हाट्सअपवर पाठवत फेसबुकवर व्हायरल केले. म्हणून मुलीच्या वडिलांनी सुधाकरला समज दिली. पण त्यांनतर सुद्धा सुधाकर मुलीला फोन करून लग्न कर अन्यथा आत्महत्या करेल अशा धमक्या देत होता. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने कुटुंबीयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मुलीसाठी स्थळ पाहून तीच लग्न करण्याचं आई-वडिलांनी ठरवलं. त्यानुसार साखरपुडा सुद्धा करण्यात आला. त्यांनतरही सुधाकरने लग्न तोडण्याच्या धमक्या देत मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली होती. मात्र मुलीचे लग्न होऊन दोन महिने झाल्यानंतर सुद्धा सुधाकर सतत ब्लॅकमेल करत असल्याने मुलीच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो व्हायरल करण्याची धमकी...
सुधाकर याने पीडित मुलीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ तयार केले होते. त्यामुळे सतत हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची तो धमकी देत होता. तर काही फोटो फेसबुकवर टाकले सुद्धा होते. विशेष म्हणजे मुलीच्या वडिलांनी सुधाकरच्या गावी जाऊन त्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना समजून सांगितले होते. पण त्यांनतर सुद्धा त्याचे कारनामे बंद झाले नाहीत. एवढच नाही तर लग्न झाल्यानंतर सुद्धा तो मुलीला सतत त्रास देत होता. त्यामुळे अखेर मुलीने पोलिसात धाव घेत त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.