शिर्डीत 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत; राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
शिर्डी संस्थानचा वादग्रस्त कारभार उजेडात आणणाऱ्या एबीपी माझाच्या दोन प्रतिनिधी आणि कॅमेरामॅनविरोधात संस्थानच्या वतीने तब्बल अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी : माध्यमांवर गुन्हा दाखल करणं याचं समर्थन कोणी करू शकणार नाही आणि साईबाबा संस्थानाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली हे निश्चितच दुःखद आहे. पण त्यांनी कारवाई तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणि नितीन ओझा यांच्यासह एबीपी माझाच्या कॅमेरामनवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासंदर्भात बोलताना भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
"प्रसारमाध्यमांचं महत्व आहे, त्यांना लोकशाहीचा चौथा स्थंभ आपण मानतो. समाजाच्या समस्या ते मांडत असतात. साईबाबांचे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून त्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या अडचणी अथवा गैरसोयी मांडण ही माध्यमांची भूमिकाच आहे. कारण त्यात सुधारणा व्हावी हा उद्देश असतो. परंतु त्याचा विपर्यास म्हणून संस्थानाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करणं, याचा मी प्रथम निषेध करतो आणि तत्काळ हे गुन्हे मागे घ्यावेत, असा आग्रह मी संस्थानाकडे करणार आहे." असं भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. आवश्यकता भासल्यास राज्यसरकारकडे सुद्धा ही मागणी करणार असल्याचं विखे पाटलांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.
"अधिकाऱ्यांबरोबर बसून हा समन्वय करावा लागणार असून कारण हा दररोजचा संघर्ष आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनीसुद्धा थोडं भान ठेवून सौजन्याची आणि समनव्याची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. अधिकारी बदलून हा प्रश्न सुटणार नाही, शेवटी येणारा अधिकारीसुद्धा त्याच पद्धतीने वागणार असले, तर मला वाटतं प्रशासनाचा आणि माध्यमांचा योग्य समन्वय राहिला तर येणाऱ्या भक्तांना दर्शन घेण्यात सुलभता येईल आणि तोच समन्वय साधण्यासाठी माझा प्रयत्न राहील.", असंही भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. "आता गुन्हा दाखल झालाच आहे. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या घटनेचा गुन्हा दाखल करणं याच समर्थन कोणीच करणार नाही आणि मी तर अजिबात करणार नाही." असं स्पष्ट मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलं आहे.
दरम्यान, शिर्डी संस्थानचा वादग्रस्त कारभार उजेडात आणणाऱ्या एबीपी माझाच्या दोन प्रतिनिधी आणि कॅमेरामॅनविरोधात संस्थानच्या वतीने तब्बल अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे आहेत. साधारणतः गेल्या 4 महिन्यापासून ते संस्थानचा कारभार बघत आहेत. या कालखंडात उल्लेखनीय कामगीरी करण्याऐवजी वादग्रस्त निर्णय घेतल्यानेच बगाटे कायम चर्चेत राहिले आहेत. एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन ओझा, मुकुल कुलकर्णी आणि कॅमेरामन यांच्या विरोधात भा. द. वि. 353, 188, 34 साथरोग कायदा 1897 च्या कलम 2,3,4 व आपत्ती व्यवस्थापन सन 2005 चे कलम 51 अ/ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि गुरुस्थानजवळ भक्तांच्या मुलाखती घेणे आणि लाईव्ह प्रक्षेपण करत गर्दी गोळा केली. त्यामुळे साई भक्तांना येण्या -जाण्यात अडथळा निर्माण केला आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांशी वाद घातला असा आरोप करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :