शिर्डी संस्थानचा वादग्रस्त कारभार उजेडात आणणाऱ्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल, सर्व स्तरांतून निषेध
एबीपी माझाच्या प्रतिनिधीवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिर्डीसह राज्यभर असंतोष पसरला असून सर्व स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बगाटे यांची बदली करण्याची मागणी होत आहे.
शिर्डी : शिर्डी संस्थानचा वादग्रस्त कारभार उजेडात आणणाऱ्या एबीपी माझाच्या दोन प्रतिनिधी आणि कॅमेरामॅनविरोधात संस्थानच्या वतीने तब्बल अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे आहेत. साधारणतः गेल्या 4 महिन्यापासून ते संस्थानचा कारभार बघत आहेत. या कालखंडात उल्लेखनीय कामगीरी करण्याऐवजी वादग्रस्त निर्णय घेतल्यानेच बगाटे कायम चर्चेत राहिले आहेत. एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन ओझा, मुकुल कुलकर्णी आणि कॅमेरामन यांच्या विरोधात भा. द. वि. 353, 188, 34 साथरोग कायदा 1897 च्या कलम 2,3,4 व आपत्ती व्यवस्थापन सन 2005 चे कलम 51 अ/ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सरकारी कामात अडथळा आणणे आणि गुरुस्थानजवळ भक्तांच्या मुलाखती घेणे आणि लाईव्ह प्रक्षेपण करत गर्दी गोळा केली. त्यामुळे साई भक्तांना येण्या -जाण्यात अडथळा निर्माण केला आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांशी वाद घातला असा आरोप करण्यात आले आहे.
कान्हूराज बगाटे यांच्या आदेशानुसार उपमुख्य कार्यकरी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. बगाटे सोमवारपासून 10 दिवसांच्या रजेवर आहेत.
कान्हूराज बगाटे यांनी 353 अंतर्गत म्हणजे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय. असा खोटा गुन्हा दाखल करून बगाटे यांनी कायद्याचा गैरवापर करून कायद्याचे महत्त्व आणि गांभीर्य कमी केल्याची टीका होत असून बगाटे आल्यापासून शिर्डीत एकापाठोपाठ एक वादाची परंपरा कायम असल्याचं या घटनेवरून अधोरेखित झाला आहे.
शिर्डी साई संस्थानने APB माझाच्या प्रतिनिधींवर केलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यात येत आहे. अहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनने देखील निषेध केला आहे. या संदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले, शिर्डी येथील साई संस्थानने माध्यम प्रतिनिधीवर दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यात येणार आहे. अडीच महिन्यानंतर गुन्हा दाखल केला याची देखील चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर दाखल गुन्ह्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल.
एबीपी माझाच्या प्रतिनिधीवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिर्डीसह राज्यभर असंतोष पसरला असून विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पासून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तहसीलदार यांच्यां पर्यंत निवेदन देऊन खोटा गुन्हा मागे घेऊन बगाटे यांची बदली करून ग्रामस्थांना वेठीस धरणाऱ्या कान्हूराज यांच्या ताब्यातून संस्थानची सुटका करण्याची मागणी होत आहे.
आता सरकार नेमकं काय पावलं उचलत हे बघणे महत्वाचे आहे. कारण सरकारी कामात अडथळा झाला याची जाणीव जर बगाटे यांच्यासारख्या उच्च पदस्थ अधिकारी अडीच महिन्यानंतर होत असेल, तर ते किती कार्यक्षम आहेत आणि कामात किती तत्पर आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
एबीपी माझाच्या प्रतिनिधींवर शिर्डीत दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रताप दीघावकर यांना तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.