'ओबीसींमधून 0.1 टक्केही आरक्षण कमी होणार नाही, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची आमची भूमिका' : चंद्रशेखर बावनकुळे
मराठा समाजाला फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. आताच्या विशेष अधिवेशनात सर्व पक्षीय आमदार बहुमताने मुख्यमंत्री जो कायदा आणतील त्याला पाठिंबा देतील, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : राज्य मागासवर्ग आयोगाने प्रस्ताव दिलाय. सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळ आरक्षण (Maratha Reservation) देण्याकरता हे सर्वेक्षण झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहे. आम्ही सुद्धा मराठा आरक्षण द्यावे आणि कोर्टाच्या चौकटीत बसवून द्यावे, या मताचे आहोत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरक्षण दिले होते. आता सुद्धा जे विशेष अधिवेशन आहे. त्यामध्ये सर्व पक्षीय आमदार बहुमताने मुख्यमंत्री जो कायदा आणतील त्याला पाठिंबा देतील, आमचाही पूर्ण पाठिंबा राहील. ओबीसीमधून शून्य पॉईंट एक टक्का आरक्षणही (OBC Reservation) कमी केले जाणार नाही. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, ही आमची भूमिका असल्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.
सरकारने भूमिका घेतलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या आरक्षणाबाबत सरकारने पूर्ण अभ्यास केलेला आहे. सरकारने कायद्याच्या अडचणी तपासल्या सोडवल्या असतील मला असं वाटतं. मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे टिकणारे आरक्षण असेल असेच मला वाटते, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही
जरांगे यांच्या मागणीवर बावनकुळे म्हणाले की, कोणी काय मागणी केली मला फार स्पष्टीकरण द्यायचं नाही. झिरो झिरो वन टक्केही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. हे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये मान्य झाले होते. एकमत झाले होते. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे तर मराठा समाजाला इंडिपेंडेंट द्यावे लागेल, ही भूमिका आमची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आरक्षणावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत
आरक्षणाचा निवडणुकीला फायदा की नुकसान होईल याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, आरक्षण हा सामाजिक मुद्दा असतो. समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. यावरती निवडणुका वगैरे जिंकल्या जात नाही. याकडे निवडणुकांच्या दृष्टीने बघू नये. 1000 टक्के सरकार अशी कुठलीही चूक करणार नाही. सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी काढल्या होत्या, मत व्यक्त केले होते, ते दुरुस्त करून सरकार पुढे जाईल. विधिमंडळात कायदा येऊ द्या. त्यात काय काय तरतुदी आहेत ते बघायला पाहिजे. आज त्यावरती फार बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जरांगे पाटील यांना विनंती करतो, त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहे. सरकारने घेतलेल्या भूमिकेचे जरांगे यांनी स्वागत करावे आणि उपोषण मागे घ्यावे अशी विनंती त्यांनी केली.
अजित पवार ज्याला घड्याळ देतील त्याला पूर्ण ताकदीने जिंकवून आणू
बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उमेदवारीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) हे ज्याला घड्याळ देतील त्याला पूर्ण ताकदीने जिंकवून आणू. 60 टक्के मत घेऊन आमचा उमेदवार जिंकून येईल. बारामतीच्या जनतेवर विश्वास आहे. साधारणतः मला असं वाटतंय की, अजितदादा तिथले नेते आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. बारामती त्यांचा गृह जिल्हा आहे. बारामतीची जागा अजित दादांना द्यावी, यावर आमचं एकमत होईल, असं मला वाटतं.
महाराष्ट्रातून 713 लोक राष्ट्रीय अधिवेशनाला जाणार
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातून 713 लोक राष्ट्रीय अधिवेशनाला जाणार आहेत. जी काही शिदोरी मिळले त्यावर महाराष्ट्र त्यांच्या मागे कसे उभं राहिलं ते आम्ही बघू, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
आणखी वाचा