GST 2.0 : कार, दुचाकी, टीव्ही, सिमेंट ते घरबांधणीची सामग्री उद्यापासून होणार स्वस्त, जाणून घ्या संपूर्ण यादी
GST 2.0: जीएसटी उद्यापासून लागू; कार, दुचाकी, अन्नपदार्थ आणि घरबांधणीच्या वस्तूंवर मोठा दिलासा. कंपन्या ग्राहकांना फायदा देतील का यावर लक्ष असेल.

GST 2.0 : देशभरात उद्यापासून (22 सप्टेंबर) जीएसटी 2.0 ची अंमलबजावणी होत आहे. केंद्र सरकारच्या या नव्या कररचनेमुळे अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी होणार असून ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. कार, दुचाकी, जीवनावश्यक वस्तू, घरबांधणीसाठी लागणारे साहित्य यापैकी काहींच्या किंमतींमध्ये मोठी घट होईल अशी अपेक्षा आहे. सध्या ग्राहकांच्या दृष्टीने सर्वात मोठा बदल म्हणजे अन्नपदार्थांच्या दरात घट होणार आहे. यामध्ये पनीर, भाकरी, पराठा यांवरील कर शून्यावर आला आहे. तूप, लोणी, नूडल्स, पास्ता, टॉफी, कँडी आणि फ्लेवर नसलेले पॅक मिनरल वॉटर यांवरील करात 7 ते 13 टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि किराणा बाजारात दर कमी होण्याची शक्यता आहे. तंबाखू, दारू आणि लग्जरी वस्तूंवरील करदर मात्र वाढवण्यात आला आहे. त्यावरून सरकारने साध्या ग्राहकांना दिलासा दिला असला तरी श्रीमंत वर्गावर अतिरिक्त भार टाकला असल्याची चर्चा आहे.

कार व दुचाकी होणार परवडणाऱ्या होतील
ऑटोमोबाईल क्षेत्रात जीएसटी 2.0 चा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. मारुती सुझुकीच्या इर्टिगा, डिझायर, वेगनआर, बलेनो आणि फ्रॉन्क्सच्या किमती 30 हजार ते 80 हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे इतर कंपन्याही त्यांच्या गाड्यांच्या किंमती कमी करण्याची तयारी करत आहेत. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कार खरेदी परवडणारी ठरणार आहे. दुचाकी क्षेत्रातही अशाच प्रकारे कपात होण्याची शक्यता आहे.
घरबांधणी स्वस्त होणार
घरबांधणीसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तूंवरील करदर कमी झाल्यामुळे बांधकाम खर्च घटेल. सिमेंट, लोखंड, रंग-रसायने आणि इलेक्ट्रिकल फिटिंग्ज यावर दिलासा मिळेल, अशी प्राथमिक माहिती आहे. यामुळे घर घेण्याचा किंवा बांधण्याचा विचार करणाऱ्या कुटुंबांना फायदा होऊ शकतो.
ग्राहकांना थेट फायदा मिळेल का?
करदर घटल्यामुळे वस्तू स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र हा फायदा प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत कंपन्या पोहोचवतील का हा मोठा प्रश्न आहे. गतकाळातील अनुभव लक्षात घेता अनेक कंपन्यांनी करदर कमी झाल्यानंतरही किंमती कमी केल्या नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने या वेळेस थेट किंमत घट तपासण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. राज्यांच्या करआयुक्तांनाही कडक निरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.
महागाईला ब्रेक लागेल का?
महागाईचा फटका बसलेल्या ग्राहकांसाठी जीएसटी 2.0 काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो. अन्नधान्य, दूध-तूपासारख्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे घरगुती खर्च कमी होईल. त्याचबरोबर वाहन खरेदी आणि घरबांधणीचा खर्च कमी झाल्यास बाजारात खरेदीवाढ होऊन आर्थिक चक्र गतीमान होण्यास चिन्हे आहेत. दुसरीकडे, विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे. जीएसटी कपात केवळ निवडणूकपूर्व डाव आहे, असा आरोप केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























