कोरोनाकाळात चंद्रपूर महानगरपालिकेची उधळपट्टी, महापौरांच्या नव्या गाडीला VIP नंबरसाठी हजारोंचा खर्च
नवीन गाडीसाठी VIP नंबर मिळावा म्हणून 70 हजार रुपये का खर्च केले हा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे महानगरपालिकेच्या या कारभारावर सर्वच स्तरातून टीका होतेय.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरांसाठी घेण्यात आलेल्या एका गाडीला VIP नंबर मिळावा म्हणून तब्बल 70 हजार रुपये RTO ला मोजण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी ही बाब समोर आणली आहे. कोरोनाच्या संकटकाळात चंद्रपूर महानगरपालिकेने केलेल्या या वायफळ खर्चावर सर्वच स्तरातून टीका होतेय.
चंद्रपूर शहरात जेव्हा कोरोनाचा हाहाकार माजला होता तेव्हा चंद्रपूरच्या महानगरपालिकेला नवीन गाडी घेण्याची अचानक गरज वाटली. त्यामुळे
जवळपास 11 लाखांची ही नवीन कोरी गाडी महानगरपालिकेकडून खरेदी करण्यात आली. आता हे काही कमी होतं की काय तर या गाडीला 1111 हा खास नंबर मिळावा म्हणून तब्बल 70 हजार रुपये महापालिकेच्या वतीने जास्तीचे खर्च करण्यात आले.
कोरोनाकाळात चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची भिस्त ज्या महानगरपालिकेच्या खांद्यावर होती त्यांनी अशा प्रकारे कोरोना काळात अत्यावश्यक बाबींवर पैसा खर्च करण्याऐवजी एकतर नवीन गाडी का खरेदी केली आणि नवीन गाडीसाठी VIP नंबर मिळावा म्हणून 70 हजार रुपये का खर्च केले हा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे महानगरपालिकेच्या या कारभारावर सर्वच स्तरातून टीका होतेय.
कोरोनाकाळात केलेल्या उपाय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेवर अनेक आरोप झाले आहे. त्यातच आगामी 7 ते 8 महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे हे VIP नंबरचं प्रकरण सत्ताधारी भाजपला महागात पडू शकतं. त्यामुळे भाजपने या प्रकरणात तातडीने आयुक्तांना धारेवर धरत आपले हात झटकले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत उघडकीस आलेलं हे VIP नंबरचं प्रकरण एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आलं आहे. हे विशेष मात्र त्याच मनपात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हे कधीच का दिसलं नाही, हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
