नव्या वर्षात लागणार तुमच्या खिशाला कात्री, जाणून घ्या 1 जानेवारीपासून काय काय महागणार?
1 जानेवारी 2022 पासून जीएसटी ( GST ) शी संबंधित काही नियम बदलणार आहेत. त्यामुळे काही गोष्टी महाग होणार आहेत.
मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागताची (New Year) तयारी करण्यात व्यस्त असाल तर प्रथम ही बातमी वाचा. कारण नव्या वर्षात तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून जीएसटी ( GST ) शी संबंधित काही नियम बदलणार आहेत. त्यामुळे काही गोष्टी महाग होणार आहेत.
नव्या वर्षात ओला-उबेर ऑटो रिक्षा बुकिंगसह 1 हजार रुपये किंमतीहून अधिकचे चप्पल, बूट, कपडे महाग होणार आहेत. जीएसटीची चोरी किंवा हेराफेरी रोखण्यासाठी सरकार जीएसटीच्या नियमात बदल करणार आहे. व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठीही काही नियम आणले जात आहेत. तर जाणून घेऊया नव्या वर्षात काय काय महागणार?
हळद हा शेतीमाल नाही असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2022 पासून सांगलीच्या हळद बाजारात वाळवलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीला 5 टक्के जीएसटी द्यावा लाणार आहे.
शेतकरी पिकवलेली हळद काढून शिजवतात. हळदीला पॉलिश केली जाते. हळद स्वच्छ केली जाते. दोन वर्षापुर्वीच अशी हळद शेतीमाल नाही असे व्यापारी सांगत होते. केंद्रीय जीएसटी विभागाने त्यावेळीही हळदीचा शेतीमालात समावेश नाही हे सांगितले होते. त्यामुळे 1 जानेवारीपासून हळद महागणार आहे.
चप्पल, बूट, कपडे खरेदी करणे 1 जानेवारीपासून अधिक महाग होईल. केंद्र सरकारने चप्पल, बूट, कपडे या वस्तूंवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के केला आहे. विणलेले कापड, सिंथेटिक धागे, ब्लँकेट, तंबू तसेच टेबल क्लॉथ यासारख्या वस्तूंवर जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. पण तो सरसकट लागू होणार नाही.
सरकारने एक हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांवरील जीएसटी दर 5 टक्के वरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
नवीन वर्षात ओला आणि उबेरसारख्या अॅप्सद्वारे बुक केलेल्या ऑटो रिक्षाचा प्रवास आणखी महाग होईल. 1 जानेवारीपासून ऑटो बुकिंगवर 5 टक्के GST लागू होईल. परंतु यात एक सवलत देण्यात आली आहे. तुम्ही रस्त्यावरून किंवा ऑफलाईन पद्धतीने वाहन बुक केले तर तुमचा प्रवास GST च्या कक्षेत येणार नाही.
झोमॅटो, स्विगी सारख्या कंपन्या 1 जानेवारीपासून डिलिव्हरीवर जीएसटी भरतील. फूड डिलिव्हरी अॅपने डिलिव्हरीवर 5 टक्के जीएसटी जमा करावा लागेल. परंतु, यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही. अशा ऑर्डरवर रेस्टॉरंट्स आधीच जीएसटी भरत आहेत. आता रेस्टॉरंटऐवजी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्या सरकारला प्रत्येक डिलिव्हरीवर 5 टक्के जीएसटी देणार आहेत.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, जीएसटी चोरी किंवा हेराफेरी रोखण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी नवे नियम आणले जात आहेत. 1 जानेवारीपासून जीएसटीचे अधिकारी कोणत्याही व्यावसायिकाच्या दुकानात, कारखान्यात कोणतीही पूर्वसूचना न देता थकबाकी वसुलीसाठी पोहोचू शकतात. जीएसटीचा परतावा हवा असेल तर क्लेमसाठी आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे.
वाहनधारकांच्या खिशाला लागणार कात्री?
आधीच पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना नवीन वर्षात वाहन धारकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण टोलमध्ये आणखी वाढ करण्याचा प्रस्ताव सरकार समोर ठेवण्यात आला आहे.
एचडीएफसी आणि अॅक्सिस बॅंकेच्या ग्राहकांच्या खिशाला कात्री
एचडीएफसी (HDFC Bank) आणि अॅक्सिस बॅंकेच्या (Axis Bank) ग्राहकांच्या खिशाला नव्या वर्षात कात्री लागणार आहे. एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांनी इतर बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढले तर त्यांना प्रत्येक व्यवहारावर 21 रूपये चार्ज लागणार आहे. जीएसटी अंतर्गत हा बदल करण्यात आला असून 1 जानेवारीपासून हा नियम लागू होणार आहे. तर अॅक्सिस बॅंकेकडून त्यांच्या ग्राहकांसाठी 10 रूपये चार्ज लावण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या