Kanyaka Bank : चंद्रपुरातील कन्यका बँकेच्या सहा संचालकांसह 16 जणांवर गुन्हा दाखल
विदेशात राहणाऱ्या व्यक्तीचा नागपूर इथला भूखंड तोतया व्यक्ती आणि बोगस कागदपत्र तयार करुन गहाण ठेवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर इथल्या कन्यका नागरी सहकारी बँकेच्या सहा संचालकांसह एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदेशात राहणाऱ्या व्यक्तीचा नागपूर इथला भूखंड तोतया व्यक्ती आणि बोगस कागदपत्र तयार करुन गहाण ठेवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल भास्कवार आणि चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा देखील समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार शीला मनोहर कऱ्हाळे यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांसह इतर आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. इलेक्ट्रिक अभियंता असलेले मनोहर कऱ्हाळे हे मूळचे नागपूरचे असून त्यांच्या मालकीचा खामला परिसरात भूखंड होता. 1965 मध्ये नोकरीनिमित्त अमेरिकेला गेले होते. शीला या मूळच्या मुंबईच्या असून त्या देखील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या होत्या. तिथे त्यांनी मनोहर कऱ्हाळे यांच्याशी ओळख झाली. दोघांनी लग्न केलं आणि तिथेच स्थायिक झाले. 2018 मध्ये ते अमेरिकेतून परत आले आणि 2019 मध्ये मनोहर कऱ्हाळे यांचा मृ्त्यू झाला.
सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द, RBI ची कारवाई
मात्र जून 2020 मध्ये कन्यका नागरी सहकारी बँकेच्या सीताबर्डी शाखेने मनोहर कऱ्हाडे यांचा भूखंड लिलावासाठी काढल्याची माहिती शीला कऱ्हाळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात मुख्य आरोपी असलेल्या स्वप्निल भोंगाडे याने बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांशी संगनमत करुन मनोहर कऱ्हाडे नावाची तोतया व्यक्ती उभी करुन तो भूखंड गहाण ठेवला. त्या भूखंडावर 1 कोटी 25 लाखांची उचल करण्यात आली. दलाल पराग भोसले आणि अनिता भोसले यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन पुन्हा 60 लाखांचे कर्ज काढले. परंतु कर्ज न भरल्याने कन्यका नागरी सहकारी बँकेने हा भूखंड लिलिवात काढला.
मात्र कन्यका बँकेने हे सर्व आरोप फेटाळले आहे. त्यांच्या मते सरकारी यंत्रणेने कर्जबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावरच कर्जाची रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेने या प्रकरणात कुठलाच गैरव्यवहार केलेला नाही.