Cabinet Meeting : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता
राज्य सरकारकडून गोविंदांसाठी विमाकवच जाहीरदहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाखाचे विमाकवच
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली आहे. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळणार आहे. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 31 टक्क्यावरून 34 टक्के इतका होणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपानंतरची मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. परिवहन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागसाठी निर्णय घेण्यात आले आहे.
पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
वैद्यकीय उपकरणे खरेदी जीईएम (GeM) पोर्टलद्धारे
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले
दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखाचे विमा संरक्षण
गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरणेत येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
उद्यापासून शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन
राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदार सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर तीन विरोधी पक्षाचं आव्हान असणार आहे.