राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचं कुटुंब नियोजन समुपदेशन किट वादाच्या भोवऱ्यात, किट मधील वस्तू आक्षेपार्ह असल्याचा आरोप
Buldhana News Updates : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येणारं कुटुंब नियोजन समुपदेशन किट वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या किट मधील साहित्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Buldhana News Updates : आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे कुटुंब नियोजन समुपदेशन किट (family planning counseling kit) वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या किटमध्ये असलेल्या वस्तू आक्षेपार्ह असल्याचा काहींचा आरोप आहे. तर यातून ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांचे व्यवस्थित समुपदेशन करता येईल असं काही स्वयंसेविकांचं मत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना व्यक्तीगत लैंगिक शिक्षण देणे आणि दोन बाळांमधील अंतर योग्य ठेवावं यासाठी आशा व अंगणवाडी स्वयंसेविकांना हे किट देण्यात येत असून याद्वारे नागरिकांना लैंगित शिक्षण देण्यात येते.
ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना कुटुंब नियोजनासंबंधी समुपदेशन करण्यासाठी प्रसूती, प्रसूती नंतरची गर्भधारणा, लैंगिक शिक्षण, लैंगिक स्वछता याविषयी समुपदेशन आणि शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून "कुटुंब नियोजन समुपदेशन किट " देण्यात येणार आहे. परंतु, या किट मधील साहित्य आक्षेपार्ह असल्याचं सांगत काहींनी या किटबद्दल वाद निर्माण केला होता. प्रत्यक्षात ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना यामुळे शिक्षण व समुपदेशन करण्यासाठी मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या NRHM योजने अंतर्गत व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जनतेच्या लैंगिक शिक्षणाचा भाग म्हणून हे समुपदेशन किट वाटप करण्यात येणार असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
या कुटुंब कल्याण समुपदेशन किट मधील काही वस्तू या सार्वजनिक ठिकाणी समुपदेशन करण्यासाठी योग्य नसल्याचं काहींचं म्हणणं आहे. परंतु, काळाची गरज ओळखून लैंगिक शिक्षण देणे हे क्रमप्राप्त असल्याचं व काळानुसार आणि लोकसंख्या वाढीला कारणीभूत असलेलं अज्ञान दूर करण्यासाठी ग्रामीण, शहरी भागात लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. या किट मधील वस्तूंमुळे प्रशिक्षण व समुपदेशन करण्यास मदत होणार असल्याचे मत काही आशा आणि अंगणवाडी स्वयंसेविकांचं आहे.
"कुटुंब नियोजन समुपदेशन किटमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू असल्याचं बोलल जात आहे. परंतु, प्रत्यक्षात ज्या महिला कर्मचारी हे किट घेऊन काम करणार आहेत, त्यांना याबद्दल कुठलाही आक्षेप किंवा तक्रार नाही. त्यांच्या कर्तव्याचा हा भाग असून ही केंद्र सरकारची योजना आहे. सर्व राज्यांमध्ये समुपदेशनासाठी असे किट वापरले जात आहेत. त्यामुळे यात गैर काहीही नसून बुलढाण्यासाठी 25 हजार किट प्राप्त झाले आहेत. आजच याचे प्रशिक्षण सुरू झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबद्दल कोणी चुकीची माहिती देत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबरोबरच पालकमंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांंची राज्य सरकारवर टीका
किटमधील सामुग्रीबाबत योग्य प्रशिक्षण दिलेलं नाही अशी तक्रार आशा वर्कर्सकडून करण्यात आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. "सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आश वर्कर्सचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…थोडी लाज ठेवा…मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका…असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..??
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 19, 2022
उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा…
आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून….
थोडी लाज ठेवा
मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका..@CMOMaharashtra @rajeshtope11 https://t.co/5nnFV9RSuP
महत्वाच्या बातम्या
कुटुंब नियोजन समुपदेशन किटमधील सामग्रीवरुन वादविवाद, आशा वर्कर्सची तक्रार; बुलढाण्यातील प्रकार