Samruddhi Mahamarg वर तीन दिवसात दुसरी दुर्घटना, सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला
Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर तीन दिवसात दुसरी दुर्घटना घडली आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन पुलाचे गर्डर कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.
![Samruddhi Mahamarg वर तीन दिवसात दुसरी दुर्घटना, सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला Buldhana News The girder of the bridge under construction collapsed, the trailer got stuck under the 200 ton girder Samruddhi Mahamarg वर तीन दिवसात दुसरी दुर्घटना, सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/28/f0fd11431f6e9aba20ae8391cd0d319f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बुलढाणा : लोकार्पणाच्या आधीच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज 07 मधील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काही गर्डर कोसळले. काल (27 एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एक ट्रेलर ट्रक या मोठ्या गर्डर खाली येऊन त्याचं मोठं नुकसान झालं आहे. नशीब बलवत्तर म्हणून या ठिकाणी जीवितहानी झाली नाही.
सुमारे 200 टन वजनाचा हा गर्डर जवळपास 80 फुटाहून खाली कोसळल्याने मात्र काही ठिकाणी पुलाच नुकसान झालं आहे. हा निर्माणाधीन पूल जवळपास 500 मीटर लांबीचा असून 80 फूट उंच आहे. गेल्या तीन दिवसात समृद्धी महामार्गावरील पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. या महामार्गाचं काम वेगात सुरु असून लोकार्पणाच्या घाईत अशा दुर्घटना होत आहेत की काय अशी शंका उपस्थित होत आहे.
कमानीचा भाग कोसळून दुर्घटना, एक कामगार मृत्युमुखी
यापूर्वी समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले होते. नागपूरपासून 36 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर 24 एप्रिलच्या पहाटे तीन च्या सुमारास हा अपघात झाला. या कमानीवर काँक्रिट टाकून वन्यजीवांना महामार्ग ओलांडता येईल असा पूल बांधला जात असताना कमानीचा अर्धा भाग त्यावर टाकलेल्या कॉंक्रिटसह खाली कोसळला. समृद्धी महामार्गाला एकूण 105 कमानी आहेत. त्यापैकी मोठी असलेली सोळाव्या क्रमांकाची कमान कोसळून अपघात झाला. या अपघातातील मृत कामगार हा बिहारचा असल्याची माहिती मिळाली आहे.
पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पुढे ढकललं
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं नागपूर ते वाशिमच्या सेलू बाजारपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र कमानीचा भाग कोसळल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 25 एप्रिल रोजी एक पत्रक काढून हे लोकार्पण पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे अधिकृतरीत्या 2 मे रोजीच हा लोकार्पण सोहळा होणार होता हे अजूनही MSRDC कडून सांगण्यात आलं नव्हतं, असं समृद्धी महामार्गावरील अधिकाऱ्यांनी ऑफ कॅमेरा सांगितलं. काही ठिकाणी उन्नत वन्यजीव मार्गाचं काम बाकी असल्याचं या पत्रकातून सांगण्यात आलं आहे. मात्र यानंतर या मार्गाचं लोकार्पण कधी होणार हे पत्रकात नमूद करण्यात आलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)