Buldhana: बुलढाण्यातील केमिकल कंपनीला हरित लवादाचा झटका; ठोठावला 250 कोटींचा दंड, प्रदूषण पसरवल्याचा ठपका
Buldhana Malkapur News: पाणी आणि जमिनीचं प्रदूषण पसरवणाऱ्या केमिकल कंपनीला राष्ट्रीय हरित लवादानं दणका दिला आहे. या केमिकल कंपनीला तब्बल 25 कोटींचा दंड ठोठावला आहे.
Buldhana malkapur benzo chemical News: पाणी आणि जमिनीचं प्रदूषण (Water and Soil Polution) पसरवणाऱ्या केमिकल कंपनीला राष्ट्रीय हरित लवादानं दणका दिला आहे. या केमिकल कंपनीला तब्बल 25 कोटींचा दंड ठोठावला आहे. रसायनयुक्त सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने तसेच दूषित पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने 50 शेतकऱ्यांची 250 एकर जमीन नापीक झाली. याप्रकरणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या प्रकरणात कंपनीच्या परवान्यातील अटी आणि शर्ती तसेच पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 250 कोटी रुपये दंड राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने दिला आहे. दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही लवादाने दिला आहे.
शेत जमिनीसह परिसरातील पाण्याच्या स्रोतांचे प्रचंड नुकसान
मलकापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील दसरखेड एमआयडीसीमध्ये 25 वर्षांपासून सुरू असलेल्या बेंझो केमिकल्स कंपनीच्या दूषित पाण्यामुळे शेत जमिनीसह परिसरातील पाण्याच्या स्रोतांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोला आणि नागपूर यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही. कंपनीतून वाहणारे विषारी पाणी वाघोळा, म्हैसवाडी, रणथम, दसरखेड या गावातील व परिसरातील विहिरीमध्येही मिसळत होते.
45 शेतकऱ्यांनी पुणे येथील हरित लवाद न्यायालयात
त्यामुळे दसरखेड येथील अरविंद महाजन, निना धारकर, गोविंदराव डोसे, विनोद एकडे, उमेश नारखेडे आणि इतर 45 शेतकऱ्यांनी पुणे येथील हरित लवाद न्यायालयात अॅड. साहेबराव मोरे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. याचिकाकर्त्या शेतकऱ्यांची बाजू अॅड. बिना परदेशी यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत 29 ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला.
त्यामध्ये गत दहा वर्षांत पर्यावरणासह शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बेंजो कंपनीला जबाबदार धरत प्रत्येकी 25 कोटी रुपये प्रति वर्ष दंडाप्रमाणे 10 वर्षाचे 250 कोटी रुपये दंड बेंजो कंपनीला ठोठवण्यात आला आहे आणि भविष्यात कंपनीकडून अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गंभीर कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही आदेश पुणे स्थित राष्ट्रीय हरिद लवाद न्यायालयाने दिला आहे. यामुळे मात्र आता प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यामध्ये खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या