Buldhana News : धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात आज अतिशय धक्कादायक घटना घडली. धावत्या एसटी बसच्या (ST Bus) फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले गेले.
Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात आज (16 सप्टेंबर) अतिशय धक्कादायक घटना घडली. धावत्या एसटी बसच्या (ST Bus) फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले गेले. या घटनेत दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सुरुवातीला मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्यानंतर त्यांना जळगावमधील रुग्णालयात हलवण्यात आलं.
मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यावेळी याच मार्गावरुन मलकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरुणांचे हात कापले गेले. हा अपघात इतका भीषण आहे की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडलेले आहेत , विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील अस या दोन्ही तरुणांच नाव असून त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे. सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे.
घटना नेमकी कशी घडली?
मलकापूर आगारातील बस पहाटे साडेपाच वाजता मलकापूरहून पिंपळगावदेवी इथे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी पिंपळगावदेवी आणि मलकापूर दरम्यान काही तरुण हे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. हे तरुण रोज या ठिकाणी व्यायाम करत असतात, पोलीस भरतीची तयारी करत होते, असं कळतं. याचवेळी संबंधित एसटी भरधाव वेगाने इथून जात असताना बसचा धक्का मुलांना लागला. यात दोन मुलांचे हात अक्षरश: कापले गेले आहेत. हात नुसते कापले नाहीतर तर तुटून जवळपास 50 ते 60 फूट अंतरावर जाऊन पडले. यावेळी चालकाने बस थोडा वेळ थांबवली, पाहिलं आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून गेला. या जखमी मुलांना तिथेच सोडून चालक निघून गेला. ही घटना जवळच्या गावातील लोकांना समजल्यानंतर त्यांनी या दोन्ही तरुणांना मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल केलं. परंतु दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.
संतप्त रहिवाशांचा आगारवर हल्लाबोल
दरम्यान संतप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर कशी काढली, असा सवाल रहिवाशांनी विचाराला. खरंत एखादी एसटी बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी तिची तपासणी केली जाते. काही त्रुटी वगैरे नाही या हे पाहिलं जातं. परंतु संबंधित बसचा पत्रा बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर पडली आणि पुढील दुर्घटना घडली. जवळपास 200 जणांचा जमाव इथे होता. परिणामी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.