Breaking News LIVE : पवित्र रमजान महिनाची सुरुवात, उद्या पहिला रोजा, घरातच नमाज पठण करण्याचे सोलापूर शहर काझींचे आवाहन
Breaking News LIVE Updates, 12 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गुढी पाडवा, नववर्षाच्या शुभेच्छा
कोरोनावर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असं आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारिका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबुया. नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजूला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करूया. गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
Maharashtra Corona Cases : काहीसा दिलासा! सोमवारी 52312 रुग्णांना डिस्चार्ज तर 51751 कोरोनाबाधितांची वाढ
राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांचा आकडा कालच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाचं म्हणजे आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या वाढ झालेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे. राज्यात आज 51751 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 52312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2834473 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 564746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज राज्यात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण 58,245 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.94% झाले आहे. पुण्यात आज दिवसभरात 9621 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 86 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
छत्री, रेनकोट, ताडपत्री व्यावसायिकांना दिलासा, अत्यावश्यक सेवेच्या यादीत समावेश
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असताना अत्यावश्यक सेवेत छत्री, रेनकोट आणि ताडपत्री व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे. पावसाळा सुरु होण्याआधी छत्री, रेनकोट आणि ताडपत्री विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा सीजन फक्त दोन ते तीनच महिनेच असतो. त्यामुळे या व्यापाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समावेश करत दिलासा देण्यात आला आहे. भिवंडी आणि परिसरात व्यापाऱ्यांचे कारखाने सुरु आहेत. उत्पादन होत असताना माल विकायचा कुठे असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला होता. आज व्यापारी वर्गाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रांकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. व्यापारी वर्ग, कामगार वर्गाकडून राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांचेही पोट मुंबईतील छत्री बाजारावर भरत असते. या बाजारात जवळपास 400 दुकाने आहेत. ह्यातील काही दुकानांमध्ये छत्री, रेनकोटचा ठोक माल विकल्या जातो. ज्यात हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात तीन ते चार महिनेच होत असतो. त्यामुळे जर आता पुन्हा यावर्षी लॉकडाऊनची झळ व्यापाऱ्यांना बसली असती तर मोठं नुकसान झालं असतं असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे व्यावसायाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश झाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.
पवित्र रमजान महिनाची सुरुवात, उद्या पहिला रोजा, घरातच नमाज पठण करण्याचे सोलापूर शहर काझींचे आवाहन
मुस्लीम धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. इस्लाम मान्यतेनुसार शाबान महिन्याची तीस तारीख संध्याकाळी संपल्यानंतर रमजानची सुरुवात झाली. आजपासून तरावीह नमाज पठण केले जाणार आहे. तर उद्या पहिला रोजा असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती साजरा होत असलेल्या रमजानवर देखील अनेक निर्बंध आले आहेत. नागरिकांनी या निर्बंधाचे पालन करावे. सहेरी, इफ्तार तसेच सर्व नमाज पठण हे घरातच राहून करावे असे आवाहन सोलापूर शहर काझी मुफ्ती अमजद अली यांनी केले.
मुंबई - गोवा हायवेवर पळस्पेनजीक कारने घेतला पेट
मुंबई - गोवा हायवेवर पळस्पेनजीक कारने घेतला पेट, वाहनचालक सुखरूप, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता, कारमधील सीएनजीचा स्फोट
पालघर पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कोरोनाची लागण
पालघर पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कोरोनाची लागण, वसई येथील गोल्डन पार्क रुग्णालयात पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे दाखल, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांची माहिती
धुळे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना
धुळे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना धुळे एलसीबीने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रेमडेसिवीरसह सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान रेमडेसिवीर हे इंजेक्शन देवपुरात 16 हजार रुपयात विकले जाणार होते. व्यवहार होण्यापूर्वी एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल झाल्यावर मेहबूब शेखला का अटक नाही?, औरंगाबाद खंडपीठाचा सवाल
औरंगाबाद : औरंगाबादच्या सिडको पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि या गुन्ह्याच्या तपासावर औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर मेहबूब शेखला का अटक नाही? हा प्रश्न औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केला आहे. त्याबरोबरच औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांना तपासाचे धडे देण्याची गरज असल्याचे ही खंडपीठ म्हणाले आहे. या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 2 आठवड्यात बी समरी रोपोर्ट पिढीतेला द्यावा. पिढीतेने 2 आठवड्यात आक्षेप नोंदवावा. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बी समरी वरील निर्णय गुणवत्तेवर निर्णय घ्यावा असे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश दिले. आरोपीच्या अटकेसाठी पिढीतेन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे या प्रकरणी कोर्टाने हे ताशेरे ओढले आहेत.