Maharashtra Headlines 20th June : महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
उद्या कोकण रेल्वेवर तीन तासांचा 'मेगाब्लॉक'
कोकण रेल्वेवर उद्यापासून (21 जून 2023) तीन तासांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी उद्या (बुधवार) तीन तासांचा 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा थेट परिणाम होणार आहे. वाचा सविस्तर
अहमदनगरमध्ये अवैध धंद्याची तक्रार केल्याने दोन तरुणांवर तलवारीने वार; एकाचा मृत्यू, एक जखमी
अवैध धंद्याची पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दोन तरुणांवर तलावारीने वार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्याची तक्रार पोलिसांकडे केल्याच्या रागातून काल (19 जून) मध्यरात्री ही घटना घडली. ओंकार भागानगरे असं मयत युवकाचं नाव आहे तर शुभम पाडोळे हा या घटनेत जखमी झाला आहे. वाचा सविस्तर
नाशिकमध्ये आज प्रथमच जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ, शहरातील वाहतूक मार्गात बदल
देशभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जगन्नाथ पुरी यात्रेला प्रारंभ झाला असून नाशिक शहरात देखील जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पंचवटी परिसरातुन जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रथयात्रा संपेपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले आहे. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस 25 जूनला जालना दौऱ्यावर
शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने राज्यभरात “शासन आपल्या दारी” अभियान राबवले जात आहे. विशेष म्हणजे या अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सभा देखील घेतल्या जात आहे. दरम्यान शासन आपल्या दारी अभियानातंर्गत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात देखील सभा आयोजित करण्यात आली आहे. 25 जून रोजी ही सभा होणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाकडून नियोजन बैठकांचं धडका पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर
दर्शना पवारची हत्याच; पोलिसांचा मित्रावर संशय
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये हे निष्पन्न झालं आहे. या सगळ्या प्रकरणी पोलिसांचा तिच्या सोबत राजगडावर ट्रेकला गेलेल्या मित्रावर संशय आहे. राहुल हांडोरे असं तिच्या मित्राचं नाव आहे. राहुल 12 जूनपासून पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहे आणि अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर