ST BOD Meeting : मुख्यमत्र्यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची आज बैठक, 'हे' निर्णय होण्याची शक्यता
ST BOD Meeting : एसटीच्या संचालक मंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच आज महामंडळाची बैठक पार पडणार आहे. यात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.

ST BOD Meeting : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अर्थात एसटीच्या संचालक मंडळाची आज (4 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता बैठक होणार आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच आज महामंडळाची बैठक चार महिन्यांनंतर पार पडणार आहे. यात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. यात एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता आणि 4 हजार बस खरेदी करण्यासाठी मंजुरी या निर्णयांचा समावेश आहे. ही बैठक मागील आठवड्यात होणार होती. परंतु काही कारणाने ती रद्द झाल्याने आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
आपल्या जीवाभावाच्या एसटीने बासष्ठी पार केली आहे. संप आणि कोरोना काळात एसटीचं कंबरडं मोडलं. एसटी महामंडळाची 302 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवाशांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. ज्यात सीएनजीऐवजी 2 हजार डिझेल गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील तर 2 हजार इलेक्ट्रीक गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकेल. महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या रोडावली होती, सोबतच ज्या गाड्या आहेत त्या देखील वाईट परिस्थितीत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आणि गाड्या कमी अशी अवस्था महामंडळाची झाली होती आणि त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
एसटीचा मास्टर प्लॅन 'माझा'कडे!
1. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 4 हजार नव्या गाड्या दाखल होणार
2. सीएनजीऐवजी 2 हजार डिझेल गाड्या तर 2 हजार इलेक्ट्रिक गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील
3. यातील 700 डिझेल गाड्या नव्या रुपात त्वरीत एसटीच्या ताफ्यात येणार आहेत
4. महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 34 टक्के करण्याच्या निर्णयाला देखील मंजुरीची शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना हाती अधिकचे पैसे पडतील
5. एसटी महामंडळाचे उत्पन्नवाढीसाठी महामंडळाच्या जागा भाडेतत्वावर देण्यात येणार
6. नाशिक महापालिकेला शहर वाहतुकीसाठी जागा देणार
7. 75 वर्ष आणि त्यावरील नागरिकांसाठी वेगळ्या तिकिटांची छपाई करणार
मुख्यमंत्री एसटी महामंडळाला नवसंजिवनी देणार?
सध्या परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याने हा देखील एक दुर्मिळ योगायोग आहे. याआधी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काही काळ परिवहन खातं होतं मात्र ते एसटी महामंडळाचे अध्यक्ष नव्हते. आजच्या बैठकीत छोटे-मोठे मिळून 25 महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे, ज्यात नवे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी देखील चर्चा होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री एसटी महामंडळाला संप आणि कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी कोणती संजिवनी देतात? हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
























