एक्स्प्लोर
मुंबईतले रस्ते खड्ड्यात, मात्र त्याच कंत्राटदारांना नागपुरात पायघड्या!

नागपूर : मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालणाऱ्या सहा कंत्राटदारांना कोर्टाच्या आदेशानंतर काळ्या यादीत टाकण्यात आले. त्यांच्यावर मुंबईत खटलाही सुरु आहे. असं असताना भाजपची सत्ता असलेल्या नागपूरमध्ये मात्र ब्लॅक लिस्टेड असलेल्या कंत्राटदारांचं स्वागत केल्याचं समोर आले आहे. ज्या कंत्राटदारांवर मुंबई खड्ड्यात घातल्याचा आरोप त्यांच्यासाठी नागपूर महापालिकेनं पायघड्या घातल्या आहेत. मुंबई पालिकेनं निकृष्ट काम करणाऱ्या आरपी शहा कन्स्ट्रक्शन्ससह 6 कंपन्यांना काळ्या यादीत टाकलं. मात्र, नागपूर पालिकेच्या कृपेनं आरपी शहा कंपनीला 4 रस्त्यांची कामं मिळाली. ज्याची किंमत 34 कोटी रुपये आहे. मुंबईत 352 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सहा कंत्राटदारांवर आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेनं सहा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं आहे. काळ्या यादी कंत्राटदार - कोणार्क शाह, के आर कन्स्ट्रक्शन्स - एन मदानी, आर के मदानी कन्स्ट्रक्शन्स - नलिन गुप्ता, जे कुमार कंन्स्ट्रक्शन्स - तेजस शाह, रेलकॉन कंन्स्ट्रक्शन्स - केतन शाह, आरपी शहा कंन्स्ट्रक्शन्स - जितेंद्र किकावत, महावीर कंन्स्ट्रक्शन्स मात्र भाजपची सत्ता असलेल्या नागपूरमध्ये केतन शहा यांच्या आरपी शहा यांना कंपनीवर मेहरबानी दाखवली आहे. मुंबईतल्या खड्ड्यांवरुन भाजपने शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. भाजप खासदार किरीट सोमय्यांनी तर थेट मातोश्रीपर्यंत संबंध जोडले. पण आता मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये भाजपची सत्ता असूनही काळ्या यादीतील कंत्राटदारांना काम मिळालं आहे. आता सोमय्या आणि भाजपचे नेते नागपूरमधील सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार का, असा प्रश्न पडतो आहे.
आणखी वाचा























