राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन
येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत.
राज्यात पाच ते सात दिवस पुरेल एवढाच साठा
कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या महाराष्ट्रातील 344 रक्तपेढ्यांमध्ये 19 हजार 59 रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या 2 हजार 583 युनिट आणि मुंबईतील 58 रक्तपेढ्यांमध्ये 3 हजार 239 रक्ताच्या युनिट आणि 611 प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे.या पार्श्वभूमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं.