भाजपच्या जागा घटणार असल्याचा विनोद तावडे समितीचा अहवाल, राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात ऑपरेशन लोटस टू सुरू?
Operation Lotus 2 : भाजपच्या ऑपरेशन लोटस टू मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांना आपल्या गळाला लावण्याच्या तयारीत भाजप असल्याची माहिती आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीला घेऊन देशात एकंदरीत काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती तयार केली होती. या समितीने प्रत्येक राज्यातील स्थानिक पदाधिकारी, अभ्यासक व विश्लेषक यांच्याकडून माहिती घेऊन राज्यनिहाय आपला अहवाल तयात केला. लोकसभा निवडणुकीला घेऊन विनोद तावडे समितीने आपल्या अहवालात महाराष्ट्रात नकारात्मक स्थिती असल्याचे सांगितले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर केलेल्या या अहवालात समितीने सांगितले कि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये दुहेरी आकड्यात पक्षाला नुकसान होणार आहे. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वेगात पावले उचलत महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस टू राबवण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांचे नॉट रिचेबल असणे, अमित शहांचा महाराष्ट्र्र दौरा, बावनकुळेंना दिल्लीला तडफडकी बोलावणी हे त्याच प्रक्रियेच्या घडामोडी असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटस टू मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांना भाजप आपल्या गळाला लावण्याच्या तयारीत आहे.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे महाराष्ट्रातील 42 खासदार होते . शिंदे फडणवीस सरकारच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत भाजपचा हा आकडा 22 ते 25 च्या वर जाण्याची शकता कमी असल्याचे तावडे समितीच्या अहवालात पुढे आले आहे. अजित पवार उघड उघड बोलत नसले किंवा काँग्रेसच्या नेत्याच्या काही अडचणी असल्या तरी भाजप ऑपरेशन लोटस टू वर ठाम आहे. मात्र हे कधी व कसे करायचे याबद्दल भाजपचे केंद्रीय नेतृत्व अत्यंत सावध पावले टाकत आहे. होणाऱ्या राजकीय भूकंपाने भाजपबद्दल राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण होणार नाही याचीही काळजी भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेत आहे. त्यामुळे राज्यातील संजय सिरसाट यांच्यासारखे काही नेते हे कशासाठी थांबले आहे हे स्वतःच सांगत आहे .
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे एकमेव लक्ष लोकसभा निवडणुकीवर आहे. देशात महाराष्ट्रासह बिहार आणि कर्नाटक या राज्यात भाजपाला मोठे नुकसान होईल असेही तावडे समितीने अहवालात नमूद केले आहे . मात्र या तीन राज्यांपैकी ऑपरेशन लोटससाठी पोषक वातावरण सध्या महाराष्ट्र आहे असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत आहे .त्यामुळे राज्यातच्या राजकारणात पडद्यामागे कमालीच्या हालचाली सुरु आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलासा केला कि बंडाच्या बातम्यात काही तथ्य नाही, मी राष्टवादी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीत असेल. मात्र महाराष्ट्रासंदर्भात विनोद तावडे समितीचा आलेला अहवाल आणि पडद्यापाठीमागे घडत असलेल्या घडामोडीने महाराष्ट्र राजकारणात ऑपरेशन लोटस टू ची चर्चा रंगली आहे.
ही बातमी वाचा: