'ओठांवर छत्रपती आणि पोटात औरंगजेब हीच उद्धव ठाकरेंची निती'; भाजप नेते संजय पांडेंचे टीकास्त्र
Sanjay Pandey : भाजपने नेते संजय पांडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवजयंती साजरी करता आली नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
मुंबई : देशभरात आज शिवजयंतीचा (Shiv Jayanti 2024) उत्साह आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जात आहेत. अनेक शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर भाजपने नेते संजय पांडे यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात शिवजयंती साजरी करता आली नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
संजय पांडे म्हणाले की, अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार होते. त्यावेळी शिवजयंती साजरी करण्यावर त्यांनी प्रतिबंध आणले होते. ओठांवर छत्रपती आणि पोटात औरंगजेब हीच उद्धव ठाकरेंची निती आहे. सत्तेसाठी औरंजेबाच्या कबरीवर फुल वाहणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसले, अशी खरमरीत टीका भाजप नेते संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंचे हिंतुत्व म्हणजे बेगडी हिंदुत्व
मुंबईतील एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव द्या, असे आग्रह धरणारे उद्धव ठाकरे यांच्याबाबत आज पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कळले आहे की, यांचे हिंतुत्व म्हणजे बेगडी हिंदुत्व आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील सरकार रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुगल म्युझियमचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असे ठेवले. आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जर कोणी चालवत असेल तर ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे.
पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi) एक्सवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.'
शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी
शिवनेरी किल्ल्यावर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजन्मस्थळी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते.
आणखी वाचा