Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, बैठकींना प्रत्यक्ष उपस्थित राहणार
BJP Leader Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले असून ते आता पक्षाच्या बैठकींना प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
BJP Leader Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वतः याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. पण आता देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात राज्यसभा निवडणुकींचा धुरळा पाहायला मिळत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.
लातूर दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीसांना अचानक ताप आला. त्यामुळे दौरा रद्द करत ते मुंबईत परतले होते. त्यानंतर कोरोना चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा सोलापूर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता. या भेटीत फडणवीस दोन अपक्ष आमदारांची भेट घेऊन त्यांची मतं वळवण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्हं होती. मात्र फडणवीसांचा दौरा रद्द झाल्यामुळे पक्षाची चिंता वाढली होती. पण आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून आता ते पुन्हा एकदा बैठकांना उपस्थित राहण्यार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. 2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर बिहार निवडणुकीच्या वेळीही देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रभारी होते. कोरोना झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस होम आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर काहीच दिवसांत ते कोरोनामुक्त झाले होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणजे, भाजपमधील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक. पक्षाकडून अनेकदा त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपावल्या जातात आणि फडणवीस त्या व्यवस्थित पार पाडतात. मग ती उत्तर प्रदेशची निवडणूक असो किंवा गोव्याची. फडणवीसांनी पक्षानं दिलेली जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली. अशातच राज्यात राज्यसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. अशात आता कोरोनामुक्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सक्रिय होताना पाहायला मिळणार आहेत.