(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सत्ता गेल्याच्या नैराश्येतून कोणाला तरी हाताला धरुन भाजपचं राज्यात वादंग : बाळासाहेब थोरात
महाराष्ट्रातील सरकार गेल्याने नैराश्येतून भाजप राणा दाम्पत्य, राज ठाकरे अशा लोकांना हाताशी धरुन राज्यात वादंग निर्माण करुन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
नांदेड : महाराष्ट्रात हातचे आलेले सरकार गेल्याने नैराश्येतून भाजप राणा दाम्पत्य, राज ठाकरे असे लोक हाताशी धरुन राज्यात वादंग निर्माण करुन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रक्षोभक भाषणं करुन महाराष्ट्रातील शांतता भंग करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई निश्चित केली जाईल असं सूचक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं. नांदेड इथे आज महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब थोरात उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.
'सत्ता गेल्याच्या नैराश्येतून भाजप जुने वाद उकरुन काढतंय'
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपने हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले, भविष्यवाणी केली आणि त्यानंतरही त्यांना अपयश आलं. त्याच नैराश्येतून भाजप असे वाद उकरुन काढत असल्याचा टोला बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला. महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यातून मिळवलेला पैसा केंद्र सरकार कुठे खर्च करतंय हे पाहणंही गरजेचं आहे. केंद्र सरकार आहे ती परिस्थिती लपवून आपलं अपयश झाकण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकशाहीला, राज्य घटनेला अभिप्रेत नसणारे जाती-धर्माचे मतांसाठीचे राजकारण भाजपा करत आहे.
राज ठाकरेंवर कारवाई होणार? थोरात म्हणतात...
दरम्यान प्रक्षोभक भाषणे करुन महाराष्ट्रातील शांतता भंग करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई निश्चित केली जाईल, असं सूचक वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन निश्चित सर्वांनी केलं पाहिजे. पण राज ठाकरेंच्या या आंदोलनामुळे शिर्डीतील वर्षानुवर्षे चालणारी काकड आरतीची परंपरा मोडीत निघाली, ज्यात मुस्लिम समाजातील नागरिकांनी स्वतःही काकड आरती सुरु करण्याची मागणी केली आहे. शिवजयंती, आंबेडकर जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे सण सुद्धा सगळ्यांना साजरे करायचे आहेत. पण या वादामुळे सगळ्यावरच मर्यादा येणार आहेत.
निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काय म्हणाले?
सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन आठवड्यात घ्या असं सांगितलं आहे. पण लवकरच पावसाळा सुरु होत आहे. त्यामुळे कार्यकर्ते, सामान्य नागरिक शेतकरी हे पेरण्या आणि इतर शेतीच्या कामात व्यस्त असतील. त्यामुळे आता निवडणुका घेतल्या तर मतदानाला लोक येतील की नाही हे सांगता येणार नाही, असं मत बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं.