दिवाळीच्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज संबधात केलेल्या आरोपाचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलं आहे.
Devendra Fadnavis : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज संबधात केलेल्या आरोपाचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलं आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना गर्भित इशारा दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. याचे पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं ते म्हणाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, हे सर्वांना माहित आहे. नवाब मलिक यांनी फोटो पोस्ट केलाय, त्यासंदर्भात रिव्हर मार्चच्या संदर्भातील लोकांनी स्पष्टीकरण दिलेय. आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. चार वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. त्यांना आज सापडलाय. त्या व्यक्तीशी आमचा संबध नाही. गाण्याच्या शुटींगवेळी सर्व फोटो काढण्यात आले आहेत. सर्व टीमने फोटो काढले होते. पण नवाब मलिक यांनी फक्त माझ्या पत्नीसोबतचा फोटो ट्विट केलाय. यावरुन त्यांची मानसिकता दिसतेय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले की, भाजपचे ड्रग्ज कनेक्शन आहे. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर फोटो काढल्यानंतर जर ड्रग्ज कनेक्शन जोडलं जात असेल, तर नवाब मलिक यांचे जावई ड्रग्जसकट सापडले. जर नवाब मलिक यांचा रेशिओ लावायचा असेल तर संपूर्ण एनसीपी पार्टी ड्रग्ज माफिया झाली पाहिजे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबध अंडरवर्ल्डशी आहेत. अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. अंडरवर्ल्ड संदर्भातील पुरावे आपल्यासमोरही मांडेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवणार आहे. दिवाळी संपण्याची वाट पाहा. त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संपूर्ण प्रकरणात आपल्या जावयाची चार्जशीट कमकुवत व्हावी. अन् एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दबावामध्ये येऊन आपल्या जावयाला सुटण्याकरिता मदत करावी, याकरिता हे सर्व सुरु आहे. पण मला वाटतेय कायदा सक्षम आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नीरज गुंडे हे तुमचे सचिन वाझे आहेत? असा आरोप नवाब मलिक यांनी तुमच्यावर केलाय. या प्रश्नावर बोलतान फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात नीरज गुंडे उत्तर देतील. पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेसंदर्भात आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे. नीरज गुंडे यांच्याशी संबध आहेतच. पण मी जेवढे वेळा नीरज गुंडेच्या घरी गेलो, त्यापेक्षा जास्तवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही कालावधीत गेले आहेत. किंवा मी जेवढेवेळा मातोश्रीवर गेलोय, त्यापेक्षा जास्तवेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेले आहेत. कदाचीत माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबध असावेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.